निवडणूक आयोगाकडे प्रभागरचनेबाबत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2016 05:38 AM2016-10-02T05:38:13+5:302016-10-02T05:38:13+5:30
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्याशी संगनमत करून
पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्याशी संगनमत करून केली असल्याचा आरोप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, शहराच्या प्रभागरचनेचा आराखडा ७ आॅक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच हा आराखडा राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आला आहे.
या आराखड्यानुसार तयार करण्यात
आलेल्या प्रभागरचनेमध्ये निवडणूक आयोगाच्या नैसर्गिक नियमांचा भंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत भाजपा, शिवसेना युतीची सत्ता आल्यास भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघतील, या भीतीने राष्ट्रवादी काँगे्रस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असे उद्योग करीत असल्याचा आरोप साबळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भाजपाकडून नेमण्यात येणाऱ्या अभ्यास समितीमार्फत प्रभागरचनेचा अभ्यास केला जाईल. प्रभागरचना नैसर्गिक नियमांची भंग करणारी असल्यास त्यावर हरकती नोंदविल्या जातील. तसेच तक्रारही केली जाईल, असे साबळे यांनी सांगितले. दरम्यान ७ आॅक्टोबरला प्रभाग रचना जाहीर होणार आहे. याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे(प्रतिनिधी)