पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 03:47 PM2019-07-19T15:47:44+5:302019-07-19T15:49:17+5:30
कर्जाच्या माध्यमातून पैशांचा गैर विनियोग व अपहार केला असून, बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखल्याची तक्रार आहे.
पिंपरी : खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध कर्ज मंजूर करण्यात येत असल्याची तक्रार आहे. अशा कर्जाच्या माध्यमातून पैशांचा गैर विनियोग व अपहार केला असून, बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखल्याने २३८ कोटींचा बँक कर्जनिधी कर्जदारांकडे थकीत आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकारी व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी धनराज नथुराम आसवानी (वय ५८, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. २०१० ते २०१९ पर्यंत हा प्रकार घडला.
सेवा विकास बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कर्जदारांकडून कर्ज परतफेडीसाठी प्रोमीसरी नोट, कर्ज करारनामा, कर्ज रोखा, जामीनरोखा, नजर गहाणखत करार इत्यादी करूनही नियमित कर्ज परतफेड झालेली नाही. योग्य कर्जदारांची निवड, सुयोग्य कर्ज मंजुरी, वितरण प्रक्रिया व मंजुरी पश्चात कर्ज निधीचा विनियोग इत्यादी बाबींवर रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकीय निदेर्शांचे उल्लंघन करून बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखले. त्यामुळे २३८ कोटींचा कर्जनिधी थकीत होऊन संबंधित कर्जदाराकडे असुरक्षितरित्या नव्याजी अडकून पडलेला आहे. त्यामुळे बँकेतील ठेवीदारांचे व बँकेच्या आर्थिक हितास गंभीर बाधा पोहोचली आहे. परिणामी भागधारकांना तीन वर्षांपासून लाभांशाची रक्कम मिळालेली नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.