पन्नास हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट करणार पूर्ण
By admin | Published: June 5, 2016 03:47 AM2016-06-05T03:47:23+5:302016-06-05T03:47:23+5:30
दर वर्षी पावसाळा सुरू होताच महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जाते. विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. या वेळी ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. स्वयंसेवी संस्थांचे
पिंपरी : दर वर्षी पावसाळा सुरू होताच महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जाते. विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. या वेळी ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल, असा विश्वास मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केला.
वृक्षलागवडीचे नियोजन कसे आहे?
जागा उपलब्ध असेल, त्या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचे नियोजन असून, क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत परिसरात वृक्षलागवड केली जाणार आहे. अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २०५० वृक्षांची लागवड, ब क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात ९००, ‘क’ मध्ये ७००, ‘ड’ मध्ये २०००, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १२००, ‘फ’ कार्यालय हद्दीत १००० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. देहू -आळंदी रस्त्याच्या लगत ४ हजार वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. तसेच बीआरटी मार्गावर मोकळ्या जागेत दोन हजार झाडे लावली जाणार आहेत. रेल्वे लाइन, मोकळ्या जागा, संरक्षण खात्याच्या मोकळ्या जागा, गायरान परिसर आदी ठिकाणी अशी मिळून ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. आॅगस्टअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल.
वृक्षारोपणाची तयारी कशी केली आहे?
५० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पावसाळा सुरू होण्यास थोडाच अवधी उरला आहे. स्थापत्य विभागाने निविदा काढल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आठवडाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. महापालिकेच्या विविध उद्यानांमधील रोपवाटिकांमध्ये विविध प्रकारची रोपे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांना गृहसंस्था, तसेच अन्य ठिकाणी लागवड करण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, तसेच शाळा आदींना रोपे मोफत देण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे.
वृक्षारोपणासाठी कोणती ठिकाणे निवडली आहेत?
दुर्गादेवी टेकडी निगडी, मोशी, दिघीतील गायरान परिसर, आकुर्डी ते दापोडी रेल्वे रुळालगत, रस्त्यांलगतच्या मोकळ्या जागा या ठिकाणांसह देहू-आळंदी रस्ता, बीआरटी प्रकल्प, संभाजीनगर मॉडेल वॉर्ड या ठिकाणी वृक्षलागवड केली जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, तसेच नागरिक यांचे सहकार्य घेऊन ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. (प्रतिनिधी)