पवनानगर फाटा उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्याआधीच पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:57 AM2018-08-19T01:57:16+5:302018-08-19T01:57:37+5:30
मुदत संपूनही काम सुरू; भरावासाठीचा मुरूम, माती सेवारस्त्यावर
कामशेत : येथील पवनानगर फाटा उड्डाणपुलाचे काम गेली अनेक महिने सुरू असून, कामाची मुदत तीन महिन्यांपूर्वी संपूनही अजून काम पूर्ण नाही. या कामाच्या अंतर्गत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला भरावासाठी लावलेले आऱई़ पनेल्सची ठिकठिकाणी पडझड
होऊ लागली आहे. भरावाची मुरूम व माती ही पावसात वाहून सेवारस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत गावाच्या हद्दीतील पवनानगर फाटा येथे मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला संथ गतीने सुरू असलेल्या या कामाची मे महिना अखेर मुदत जवळ येताच कामाचा वेग वाढला. मुख्य महामार्ग ठरावीक ठिकाणी बंद करून सेवारस्त्याने वळवण्यात आला. मात्र मुदतीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यात जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली. आधीच निकृष्ट दर्जाचे काम असताना पावसामुळे सेवारस्त्याची खड्डे आणि खडी यामुळे चाळण झाली. कामामुळे महामार्गावरील वाहतुकीस मोठी अडचण व कायम वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. त्यात उड्डाणपुलाच्या भरावासाठी कडेला लावण्यात आलेले आऱ ई़ पनेल्स हे व्यवस्थित बसवले नसल्याने पुणे- मुंबई मार्गावरील आऱ ई़ पनेल्सची पडझड झाली आहे. काही ठिकाणी हे आऱ ई़ पनेल्स बाहेर आले असून, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. यातून एखादे वाहन या सिमेंटच्या बनवलेल्या आऱ ई़ पनेल्सला धडकून मोठा अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून वर्तवली जात आहे. शिवाय जोरदार पावसात ह्या आऱ ई़ पनेल्स महामार्गावर कोसळले तर मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंदर मावळातील रस्त्याची दुरवस्था
कामशेत : आंदर मावळातील कान्हे गाव व टाकवे भागात असलेल्या कंपन्यांच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शिवाय रस्त्यावर सर्वत्र चिखलाचा राडारोडा होऊन दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागते. यातूनच अनेक दुचाकी घसरून अपघात होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आंदर मावळातील टाकवे बुद्रुक औद्योगिक वसाहत आणि कान्हे भागातील कंपन्या यांचा माल घेऊन येणारे जाणारे अवजड ट्रेलर व इतर मालवाहतूक वाहने यांच्यामुळे कान्हे ते टाकवे भागातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यात या अवजड वाहनांची रस्त्याच्या कडेला दुतर्फा लांबच लांब रांग नेहमीच लागलेली असते. त्यामुळे रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या असून, सर्व मातीचा राडारोडा रस्त्यावर आला आहे. या रस्त्याच्या कडेला लागलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून, चिखलाच्या राडारोड्यातून प्रवास करणे प्रवाशांना धोकादायक बनले आहे. आंदर मावळला जोडणाऱ्या कान्हे वडेश्वर रस्त्यावर महिंद्रा कंपनी येथे रस्त्याच्या दुतर्फा दिवसरात्र अवजड वाहने उभी असतात. कान्हे ते टाकवे भागातील रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्या वर सर्वत्र चिखलाचा राडारोडा झाला आहे. तो वाहनांमुळे रस्त्यावर येत असून, रस्ताही चिखलमय होत आहे. त्यामुळे आंदर मावळातील नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. त्यात पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आंदर मावळात असते. रस्त्यावरील चिखल व खड्डे यामुळे अनेक पर्यटकांच्या दुचाकी घसरून अनेक अपघात होत आहेत.
कामशेत-जांभवली रस्त्याची दुरवस्था
करंजगाव : नाणे मावळात जाण्यासाठी कामशेत-जांभवली या रस्त्यावर (नाणे रोड) असलेले रेल्वे गेट (४३- ए) जवळ रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाºया अनेक दुचाकी व चारचाकी चालकांना त्रास होत आहे. नाणे मावळात शाळा, महाविद्यालय, धरण, तीर्थक्षेत्र असल्याने याच रस्त्याने पर्यटक, बाहेर गाववरून येणारे शिक्षक तसेच नाणे मावळातून विद्यार्थी, कामगार वर्ग, महिला ह्याच रस्त्याने कामशेत किंवा अन्य ठिकाणी कामानिमित्त जात असतात.
जीव मुठीत धरून चांदखेडमध्ये प्रवेश
चांदखेड : येथील मुख्य रस्त्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपर्यंत गावात प्रवेश असलेल्या एकमेव मुख्य रस्त्यावर चिखल झाला आहे. रस्ता चिखलाने निसरडा झाला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांना तसेच पायी चालणाºया नागरिकांना व शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाºया चांदखेड शिवणे रस्त्याच्या कामास सुरुवात केली. त्याचेही काम ठप्प झाले आहे. गावामध्ये येणारा मुख्य रस्ता खासगी जागा मालकांचा असल्याने रस्ता करण्यात अडचण येत आहे. परंतु चांदखेड शिवणे रस्त्यावर साकव पुलाच्या कामास मंजुरी मिळाली असून, लवकरच हा रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी तयार होईल, असे सरपंच अमोल कांबळे यांनी सांगितले.