बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 12:50 PM2019-03-16T12:50:41+5:302019-03-16T12:53:26+5:30
बस का थांबवली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याचा गुंडांनी खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे.
पिंपरी : बस का थांबवली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याचा गुंडांनी खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे. मंजित प्रसाद असं खून झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. विमाननगरमधील डब्लूएनएस या कंपनीत मंजित काम करत हाेता. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीच्या डीलक्स चाैकात ही घटना घडली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजित हे नेहमीप्रमाणे कंपनीच्या बसने विमाननगर येथून काळेडवाडीच्या दिशेने जात हाेते. बसमध्ये त्यांच्यासाेबत अनेक कर्मचारी देखील हाेते. पिंपरीच्या डीलक्स चाैकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवत बस चालकाला बस थांबविण्यास सांगितली. मंजित हे बसचालकाच्या शेजारी बसले हाेते. त्यांनी गुंडांना काय झाले असे विचारले असता त्यातीत एका आराेपीने त्यांच्या कानाखाली मारली. याचा जाब विचारण्यासाठी मंजित बसमधून खाली उतरले असता गुंडांनी मंजित यांना लाथाबुक्यांनी माराहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील काहींनी धारदार शस्त्रांनी पाेटावर आणि छातीवर वार केले. याता मंजित गंभीर जखमी झाले.
बसमधील कर्मचारी गुंडांच्या दिशेने धावल्याने गुंड पळून गेले. मंजित यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.