पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 01:16 PM2024-12-08T13:16:04+5:302024-12-08T13:16:18+5:30
थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे
पिंपरी : महापालिकेच्या हद्दीत ६ लाख ३३ हजार २९४ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. एकूण मालमत्ताधारकांपैकी अद्याप २ लाख २२ हजार ६५६ इतक्या मालमत्तांची थकबाकी आहे. थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे.
थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी यांना नेमले आहे. या जप्ती अधिपत्राच्या आधारे करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी यांना ‘नमुना ह’च्या जप्ती अधिपत्राद्वारे मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
२३४.३१ कोटींची थकबाकी.....
करसंकलन विभागाकडून १५ विभागीय कार्यालयांमधील ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आलेल्या मालमत्तांकडे २३४.३१ कोटींची थकबाकी असून, २८.१९ कोटींची चालू मागणी अशी २६२.५० कोटींची एकूण मागणी आहे. याच अनुषंगाने मोशी विभागीय करसंकलन कार्यालयाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली असून, स्थावर मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, मालमत्ता जप्ती सोबतच आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.
ज्या मालमत्ता जप्तीस पात्र आहेत, त्या तात्काळ जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: ज्या मालकांनी आपली निवासी मालमत्ता आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या अनुषंगाने भाडे तत्त्वावर दिलेल्या आहेत तसेच मिश्र व व्यावसायिक कारणांसाठी वापरात असलेल्या मालमत्तांसंदर्भात प्राधान्याने जप्ती करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. - अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, महापालिका
अशी आहे आकडेवारी
विभागीय कार्यालय - जप्ती अधिपत्र संख्या - थकबाकी - चालू - एकूण
निगडी प्राधिकरण - १९ - ३१.७५ - १.०३ - ३२.७८
आकुर्डी - ५४६ - १७.८९ - ४.०५ - २१.९४
चिंचवड - १७७ - १९.९१ - १.७३ - २१.६४
थेरगाव - ३८७ - २९.८२ - २.९७ - ३२.७९
सांगवी - ११३७ - ३०.२४ - ३.४६ - ३३.७०
महापालिका भवन - ४५३ - १३.८४ - २.१८ - १६.०२
फ़ुगेवाडी दापोडी - ११० - २.३४ - ०.४४ - २.७८
भोसरी - ५० - ७.१९ - ०.७७ - ७.९६
मोशी - २८३ - १०.०३ - १.१८ - ११.२१
चिखली - ४९९ - २९.९० - ३.८० - ३३.७०
तळवडे - ४५२ - १८.८८ - २.७२ -२१.६०
किवळे - ४४० - ७.१३ - १.१६ - ८.२९
वाकड - ५०६ - १५.३९ - २.७० - १८.०९
एकूण : ५०५९ - २३४.३१ -२८.१९ - २६२.५०