थुंकल्याने झालेल्या वादात बिअरची बाटली मारली डोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 03:05 PM2019-08-28T15:05:26+5:302019-08-28T18:01:39+5:30
थुंकल्याने वाद झाल्यामुळे बिअरची बाटली डाेक्यात फाेडल्याची घटना चिखली भागात घडली आहे. याप्रकरणी परस्परविराेधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
पिंपरी : बिअर शॉपीमध्ये बिअर विकत घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने थुंकल्याने वाद झाला. यात बिअरची बाटली डोक्यात मारून जखमी करून गंभीर दुखापत केली. चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावर सोमवारी (दि. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात अंगद शेषराव कांबळे (वय ४२, रा. पाटीलनगर, चिखली) याच्यासह दोन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय रादू हिरोत (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हिरोत व त्यांचा आतेभाऊ विकास मदनलाल चौहाण यात जखमी झाले आहेत.
फिर्यादी हिरोत व त्यांचा आतेभाऊ चौहाण हे दोघे चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावरील बिअर शॉपीमध्ये बिअर विकत घेण्यासाठी गेले होते. पैसे देऊन बिअर विकत घेतली. त्यानंतर दुकानाच्या बाहेर थुंकल्याने आरोपी कांबळे याने व दुकानातील दोन कामगारांनी फिर्यादी हिरोत व चौहाण यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून लाकडी बांबूने डोक्यावर व पायावर मारून, डोक्यास हातास गंभीर दुखापत केली.
तर दुसरीकडे अंगद शेषराव कांबळे (वय ४२, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय रादू हिरोत (वय २१), जितेन रादू हिरोत (वय २०) व विकास मदनलाल चौहाण (वय १९, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कांबळे देहू-आळंदी रस्त्यावरील बिअर शॉपीत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी पैसे देऊन बिअर विकत घेऊन जाताना काऊंटरजवळ थुंकल्याने फिर्यादी कांबळे यांनी त्यांना येथे थुंकू नकोस असे म्हणाले. मी येथे थुंकणार असे म्हणून आरोपीने त्याच्या हातातील बिरची बाटली फिर्यादी कांबळे यांच्या डोक्यात मारून जखमी करून गंभीर दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.