पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 09:07 PM2019-06-06T21:07:05+5:302019-06-06T21:09:29+5:30
अहिल्यादेवी हाेळकर यांच्या जयंती कार्यक्रमात घाेटाळा हाेत असल्याचा आराेप पिंपरी- चिंचवड महापालिकेचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी केला.
पिंपरी : अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिका विविध कार्यक्रम आयोजित करीत असते. मात्र महापालिका विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी यात घाेटाळा होत असल्याचा आरोप केला. यावरून महापालिकेची गुरुवारी झालेली सभा गाजली. नगरसेविका आशा शेंडगे यांनी साने यांचा निषेध केला. साने यांनीही निषेध व्यक्त केला.
महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच बोलताना आशा शेंडगे म्हणाल्या, अहल्यादेवी होळकर यांच्या मोरवाडी येथील पुतळा स्मारकावर महापालिकेच्या वतीने मेघडंबरी उभारण्यात आली आहे. अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यात येते. यंदाही आयोजन केले होते. एका नगरसेविकेच्या संस्थेला निधी देण्यात येत असल्याचे सांगून साने यांनी काही आरोप केले. त्यामुळे मी त्यांचा निषेध करते. त्यांनी आरोप पुरावा देत सिध्द करावेत. ते सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन. अन्यथा साने यांनी राजकीय संन्यास घ्यावा.
दत्ता साने म्हणाले, काही जणांकडून माझ्याकडे निवेदन आले होते. संबंधित संघटनेकडून काहीतरी काळेबेरे होत असल्याचे पत्रात नमूद केले होते. त्यानुसार मी आयुक्तांकडे पत्र दिले. त्याची शहानिशा करण्याची मागणी केली. त्याची जबाबदारी आमची नाही. जयंतीच्या कार्यक्रमास आमचा विरोध नाही. घरगुती किंवा वैयक्तिक कारणांवरून आरोप करू नयेत. याचा मी निषेध करतो.
दत्ता साने यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर महापौर जाधव यांनी त्यांना बोलण्यापासून थांबविले. त्यामुळे साने यांनी नाराजी व्यक्त केली.