सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी
By विश्वास मोरे | Published: May 11, 2024 05:36 PM2024-05-11T17:36:45+5:302024-05-11T17:38:00+5:30
पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत...
पिंपरी : मुलांना लागलेल्या शाळेत सुट्ट्या आणि शनिवार रविवार अशी आलेली सलग सुट्टी यामुळे कुटुंब आपल्या गावी निघाली आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने पालकांनी सुट्ट्यांची नियोजन केले आहे तसेच उन्हाळी पर्यटनासाठी कुटुंब बाहेर पडलेले आहेत. शनिवार, रविवार आणि सोमवारी लोकसभा मतदारसंघाचे मतदान आहे. त्यामुळे सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन उन्हाळी पर्यटनाचे नियोजन पुणेमुंबईकरांनी केल्याचे दिसून येत आहे.
पुणे मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाका येथे सकाळी अकरा वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा दिसून आल्या. या ठिकाणी फास्टट्रॅकची व्यवस्था केली असतानाही वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तळेगावकडे जाताना आणि तळेगावकडून पिंपरी -चिंचवडकडे येताना अशा दोन्ही मार्गावर गर्दी दिसून आली. दुपारी एक ते तीन च्या सुमारास देहूरोडकडून जळगावकडे जाताना टोलनाक्यापासून तर अलीकडे एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच तळेगाव कडून देहूरोड ला जाताना टोलनाक्यापासून सोमटणे फाट्यापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
निवडणूक आयोगाचा तपासणी नाका सुरू!
देहूरोडवरून तळेगावकडे जाताना टोल नाका ओलांडल्यावर लगेचच निवडणूक आयोगाच्या वतीने तपासणी नाका केलेला आहे. त्या ठिकाणी निवडणूक विभागाचे पदाधिक अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस पथक तैनात होते या ठिकाणी आलेल्या कार, ट्रक, जिप टेम्पो बस यांची तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे ही वाहतूक कोंडीत भर पडत होता. संशयित वाहनाची तपासणी करून त्याची नोंदणी या ठिकाणी केली जात होती.