लोणावळ्यातील मंडल अधिकारी कार्यालय मोजतेय अखेरची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:11 PM2020-02-10T16:11:45+5:302020-02-10T16:12:06+5:30
लोणावळा,खंडाळा ते वाकसई व परिसरातील अनेक गावांचे मंडल कार्यालय या इमारतीमध्ये
लोणावळा : लोणावळा मंडल कार्यालयाची इमारत मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत अखेरची घटका मोजत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाणारा लाकडी जिना कुजून तुटल्याने या ठिकाणी लोखंडी जिना बनविण्यात आला आहे. असे असले तरी बाल्कनी वजा व्हरांड्याच्या फळ्या कुजलेल्या असल्याने जीव मुठीत धरून कार्यालयात जावे लागत आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोर मंडल कार्यालय, भूमीअभिलेख, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय, स्टँप विक्रेते अशी बहुउद्देशीय इमारत आहे. ब्रिटिश काळात ही इमारत बांधण्यात आली आहे. मागील काही काळापासून या इमारतीची देखभाल दुरुस्ती झालेली नसल्याने ती सध्या अखेरची घटका मोजत आहे. लोणावळा,खंडाळा ते वाकसई व परिसरातील अनेक गावांचे मंडल कार्यालय या इमारतीमध्ये असल्याने येथे सतत नागरिकांची महसुली कामाकरिता वर्दळ असते, लोणावळा तलाठी कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय तसेच स्टँम्प खरेदी करिता ही इमारत सतत गजबजलेली असते. सदर इमारत ही धोकादायक बांधकाम बनल्याने ती केव्हाही पडू शकते. शासनाला वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाºया या इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागत असून नागरिकांना देखिल जीवावर उधार होऊन इमारतीमध्ये जावे लागत आहे. मंडल कार्यालयाच्या या इमारतीच्या नुतनीकरणाचे दोनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत मात्र शासनाच्या लातफिती कारभाराचा फटका याठिकाणी शासकिय कार्यालयालाच बसला आहे. प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याने त्यामध्ये कसलीही प्रगती झालेली नाही. वास्तविक लोणावळा मंडल कार्यालयाला मुबलक जागा उपलब्ध असल्याने याठिकाणी सध्याची जिर्ण झालेली इमारत पाडून नुतन प्रशासकिय इमारती बनविल्यास लोणावळा शहराच्या नावारुपाला साजेल सुसज्ज अशी प्रशासकिय इमारत तयार होऊ शकते. चांगली वास्तु निर्माण झाल्यास येथिल अधिकारी व कर्मचारी यांच्यात काम करण्याचा उत्साह देखिल येऊन कामाच्या गतीत वाढ होईल यात शंका नसल्याने मावळच्या महसुल अधिकाºयांनी सदर इमारत नुतनीकरणाकरिता पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
........
धोकादायक इमारत : लोणावळा मंडल कार्यालयाचे कामकाज ब्रिटिशकालीन इमारतीत सुरू आहे. ही इमारत धोकादायक झालेली असून, येथे दुर्घटनेची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
............
इमारतीला धोकादायक जाहीर करावे
लोणावळा मंडल कार्यालयाची इमारत जिर्ण झालेली असताना तीच्या दुरुस्तीकडे शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग दुलर्क्ष करत आहे. त्यामुळे सदरची इमारत धोकादायक जाहिर करण्यात यावी. तसेच येथील कारभार इतरत्र हालवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. धोकादायक इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरुन काम करत आहेत. नागरिकांना देखिल धोका पत्कारत महसुली कामांकरिता याठिकाणी जावे लागत आहे. याठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.