पिंपरीत रेल्वेचे जंक्शन उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:14 AM2018-09-01T01:14:22+5:302018-09-01T01:15:11+5:30

रेल्वे मंत्र्यांना साकडे : सैन्य दलाच्या डेअरी फार्मच्या जागेचा सुचविला पर्याय

Construct the junction of the railway in the pipeline | पिंपरीत रेल्वेचे जंक्शन उभारावे

पिंपरीत रेल्वेचे जंक्शन उभारावे

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी रेल्वे स्थानकालगत सैन्यदलाचा डेअरीफार्म आहे. वापर होत नसल्याने या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक येथे निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे याबाबत जगताप यांनी निवेदन दिले आहे. जगताप म्हणाले,‘‘पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पिंपरी- चिंचवड एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसराच्या नागरीकरणाचा वेग जास्त आहे. लोकसंख्या वाढल्याने येथे पोलिस आयुक्तालय सुरू झाले आहे. त्यामुळेच पुण्याला समांतर शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. शहरातील लोकसंख्याही २२ लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे शहरात मोठे रेल्वे स्थानक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त झाले आहे. असे मोठे रेल्वे स्थानक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सैन्यदलाच्या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन उपलब्ध होऊ शकते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून नाशिककडे जाणा-या प्रवाशांना या रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही पिंपरी-चिंचवड शहराला महत्त्व आहे. चिंचवड येथील महान साधू मोरया गोसावी समाधी मंदिर, जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांचे गाव असलेले तीर्थक्षेत्र देहू, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज अर्थात माउलींचे संजीवन समाधिस्थळ असलेले तीर्थक्षेत्र आळंदी, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक भीमाशंकर आदी तीर्थक्षेत्रांसाठी पिंपरी मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे पिंपरी रेल्वे स्थानकाचा विस्तार करून या स्थानकालगतच्या सैन्यदलाच्या डेअरीफार्मच्या शेकडो एकर जागेत रेल्वे जंक्शन उभारता येईल. या नवीन रेल्वे जंक्शनमुळे शहरातील लाखो प्रवाशांची सुखकर प्रवासाची सोय होईल. त्यामुळे सैन्यदलाच्या पिंपरीतील डेअरीफार्मच्या जागेवर जंक्शन उभारून मोठ्या रेल्वेस्थानकास मंजुरी द्यावी.’’

पिंपरीत सैन्य दलाचा डेअरी फार्म आहे. शेकडो एकर जागेत हा डेअरी फार्म आहे. मात्र सैन्य दलाने तो फार्म बंद केला आहे. त्यामुळे सध्या ही जागा पडून आहे. त्यामुळे सैन्य दलाकडून ही डेअरी फार्मची जागा रेल्वे मंत्रालयाकडे वर्ग करणे सहज शक्य आहे. कमी कालावधीत ही जागा उपलब्ध होऊ शकते. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील ही जागा आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे मार्गही येथून सोयीचे आहेत.

Web Title: Construct the junction of the railway in the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.