बांधकाम, वाहन उद्योगांचे सीमोल्लंघन
By admin | Published: October 11, 2016 01:35 AM2016-10-11T01:35:51+5:302016-10-11T01:35:51+5:30
गेल्या दोन वर्षांत बांधकाम व्यावसाय, वाहन उद्योगात मंदीच्या छटा होत्या. मात्र, यंदाच्या समाधानकारक पावसामुळे ग्राहक सुखावला असून,
पिंपरी : गेल्या दोन वर्षांत बांधकाम व्यावसाय, वाहन उद्योगात मंदीच्या छटा होत्या. मात्र, यंदाच्या समाधानकारक पावसामुळे ग्राहक सुखावला असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर सदनिका, नवीन वाहन खरेदीची आगाऊ नोंदणी वाढली आहे. सोनेच्या दर कायम राहिल्याने मुहूर्तावर सोने खरेदीसाठी झुंबड उडणार आहे.
भारतीय परंपरेनुसार दसरा, दिवाळीचा मुहूर्त शुभ मानला जातो. गेल्या पाच वर्षांत प्रॉपर्टीचे भाव वेगाने वाढले. मात्र, दोन वर्षांच्या मंदीमुळे भाव स्थीर होते. अनेक बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्पात सदनिका तयार होत्या. आता मंदी ओसरून बाजारात तेजी दिसू लागली आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
शहरात मध्यवर्ती भागात घर घेणे सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. महापालिका हद्दीबाहेर घर घेण्यास अधिक प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. बँक बॅलन्सनुसार वन आरके, वन बीएचके व टू बीएचके घर घेण्याची धडपड सुरू आहे. तळेगाव, आळंदी, देहू रोड, रावेत, वाकड, हिंजवडी लगतच्या नवीन प्रकल्पात आता वन रूम किचनसुद्धा उपलब्ध होत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायाला दसऱ्याच्या मुहूर्तापासून चालना मिळणार आहे.
उद्योगनगरीत मंदीच्या काळात अनेक छोटे व मोठे उद्योग लगतच्या भागात स्थलांतरीत झाले. मात्र, आजही टाटा, बजाज सारख्या कंपन्यांची प्रमुख कार्यालये येथे आहेत. दरवर्षी दसरा व दिवाळीच्या काळात वाहन उद्योगांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सवलती जाहीर केल्या जातात. त्यामुळे दस-याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी आगाऊ नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. (प्रतिनिधी)
भाव स्थिरावला : सोन्याला झळाळी
गेल्या वर्षभरात सोन्याचे भाव कमी होऊन ३० हजार रुपये (१० ग्रॅम)असे स्थिरावले होते. दस-याच्या मुहूर्तावर सोनेच्या भावात विशेष वाढ न होता. सोनेचे भाव सोमवारी ३१ हजार ८५० रुपये (१० ग्रॅम) होते. दस-याला खरेदी केल्यास समृध्दी येते, या श्रध्देमुळे सोने खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे, व्यावसायिकांचे मत आहे.