Pimpri Chinchwad: जागेवर ताबा मारून बांधकाम; वीस फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:22 AM2022-05-20T08:22:16+5:302022-05-20T08:22:32+5:30
खोट्या सह्या करून करारनामा कागदपत्रे तयार केली
पिंपरी : जागेवर परस्पर ताबा मारून त्यावर बांधकाम केले. तसेच २० फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक केली. २० फ्लॅटमध्ये राहणारे अज्ञात इसम, एक महिला आणि इतर दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे ४ जानेवारी २०१८ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये ही घटना घडली.
उल्हास पंडीत बोरोले (वय ४८, रा. भुसावळ, जि. जळगाव) यांनी बुधवारी (दि. १८) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भारती निंबा भारंबे, रवी कृष्णा चोपडे, मल्लिनाथ भीमाशंकर नोल्ला (तिघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), आणि २० सदनिकांमध्ये राहणारे अज्ञात इसम (सर्व रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरोले आणि त्यांचे सहकारी रवींद्र सिंग कच्छवाहा यांनी वाल्हेकरवाडी येथे सर्व्हे नंबर १२९/१ मधील दोन हजार ९०० चौरस फूट आणि १२९/२ एक हजार ४५० चौरस फूट जागा स्वप्ननगरी हाउसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे आहे. या जागेवर भारती भारंबे हिने अनधिकृतपणे ताबा घेतला. तेथे बांधकाम करून फिर्यादी बोरोले यांच्या नावाच्या खोट्या सह्या करून करारनामा कागदपत्रे तयार केली. बांधलेल्या त्या इमारतीमधील २० फ्लॅटची परस्पर विक्री केली. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्याची फसवणूक केली. फिर्यादी बोरोले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.