खोट्या परवानाद्वारे बांधकाम; गृहकर्जाचे हप्ते न भरता फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 02:16 PM2021-04-08T14:16:06+5:302021-04-08T14:16:21+5:30
सांगवी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल..
पिंपरी : बांधकामाच्या खोट्या परवानाद्वारे चार मजली इमारत बांधली. त्यानंतर एका सदनिकाधारकाच्या सदनिकेची विक्री करून त्या सदनिकेवर कर्ज घेतले. मात्र त्याचे हप्ते भरले नाही. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळकर नगर, पिंपळे गुरव येथे २०१२ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला.
प्रशांत सुरेश शिरसाट (रा. काटेपूरम चौक, पिंपळे गुरव), आशुतोष सुनील नितनवरे (रा. पिंपळे गुरव), दीपक कडूबाळ गायकवाड (रा. पिंपळे गुरव), ज्ञानेश्वर जगदीश पाटील, सुवर्णा ज्ञानेश्वर पाटील (दोघे रा. दिघी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिल मारुती भालेराव (वय ५६, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ७) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे गुरवमधील जवळकरनगर येथे लेन नंबर एकमध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना न घेता खोट्या बांधकाम परवानाद्वारे चार मजली इमारत बांधली. तसेच ज्ञानेश्वर पाटील याच्यासोबत संगनमत करून आरोपींनी दुय्यम निबंधक हवेली १८ यांच्या कार्यालयातील कुलमुखत्यार पत्राद्वारे फिर्यादी यांच्या हिस्स्यातील शांताई अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेची विक्री केली. विक्री केलेल्या सदनिकेवर आरोपी ज्ञानेश्वर आणि त्याची पत्नी सुवर्णा पाटील यांनी अस्पायर होम फायनान्स, फुगेवाडी या फायनान्स कंपनीकडून १४ लाख ५५ हजार ३४४ रुपयांचे कर्ज घेतले. त्याचे हप्ते न भरता आरोपींनी फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.