जुन्या जागेवर नव्याने पाण्याची टाकी उभारण्याचे काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:22 AM2019-04-03T00:22:40+5:302019-04-03T00:22:56+5:30
पिंपळे सौदागर : १५ लाख लिटर क्षमता; समस्या सुटणार
रहाटणी : स्मार्ट प्रभाग असलेल्या पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस व लोकसंख्येच्या प्रमाणात वाढच होत आहे. या वाढत्या लोकसंख्येचा परिणाम येथील सोई-सुविधांवर पडत आहे. त्यामुळे येथे महापालिका प्रशासनाला नवे प्रकल्प हाती घ्यावे लागले आहेत. या परिसरातील सहा लाख लिटर पाण्याची टाकी पाडून त्या ठिकाणी पंधरा लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
पिंपळे सौदागर येथे सुमारे २५-३० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सहा लाख लिटर पाण्याच्या टाकीची उभारणी करण्यात आली होती. मात्र सध्या या परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे पाणी अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. दिवसेंदिवस या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने जुनी टाकी पाडून
त्या ठिकाणी नवीन टाकी बांधण्याचा प्रकल्प राबवला. अंदाजे एक कोटी रुपये खर्च करून पंधरा लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्याच्या कामाला मागील दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. टाकीचे काम मार्च २०२० मध्ये पूर्ण होणार असून, ते मंगलदास इन्फोटेक
प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या कामाची
मुदत २४ महिने असून, सुमारे २० ते २५ मीटर उंचीची टाकी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा
प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत
आहेत.
बाहेरून येणारे लोंढे : सोई सुविधांवर ताण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही औद्योगिक नगरी असल्याने कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात शहराकडे वळू लागला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सोई-सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करून केलेले नियोजन बदलणे भाग पडत आहे. प्रशस्त रस्ते, पाण्याचे नियोजन, ड्रेनेजचे नियोजन अशा अनेक सुविधा कितीही चांगल्या प्रमाणात पुरविल्या, तरी त्यात त्रुटी राहत आहेत.