मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम कोसळून तीन मजूरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:32 AM2019-02-21T01:32:43+5:302019-02-21T01:33:04+5:30
पिंपळे गुरवची दुर्घटना : विविध रुग्णालयांत पाच जखमींवर उपचार
पिंपरी : पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिराभोवती सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. ५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वायसीएम, तसेच औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये मनतोष संजीव दास (वय ३०, रा. कामगार वसाहत, पिंपळे गुरव), प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५, कामगार वसाहत) या कामगारांचा समावेश आहे. सिद्धम्मा मानसप्पा पुजारी (वय ३०, रा. गोपीचाळ, खडकी) या कामगार महिलेचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. शामोन सरदार (वय २८, रा. वैदुवस्ती) कृष्णा पवार, कमलेश कांबळे, आयप्पा मल्या सुभंड हे कामगार जखमी झाले आहेत. त्या दोघांवर पिंपरीतील वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत. तर शामोन सरदार या कामगाराला कमरेला मुका मार लागला असून, त्याच्यावर औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलम्मा शंकरप्पा पुजारी या महिलेच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने मदतकार्यासाठी घटनास्थळी धावून गेले. अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे व त्यांच्या पथकाने दगडाच्या ढिगाºयाखालील मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. रुग्णवाहिकांमध्ये टाकून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. घाईगडबडीने दुर्घटना
पवना नदीपात्रालगत शिवमंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या पुढे सभामंडप उभारणीचे काम सुरू होते. दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर अडीचला पुन्हा काम सुरू झाले. सुमारे ४० कामगार या परिसरात काम करीत होते. २० फूट उंचीचा, तसेच २० बाय ३० आकाराचा सभामंडप उभारण्यात येत होता. पाषाणाचा काळा दगड वापरून नक्षीकाम केले जात होते. आधारासाठी लाकडी वासे लावले होते. वजन न पेलल्यामुळे हे दगडी बांधकाम अचानक कोसळले. मोठा आवाज झाला. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. घाई-गडबडीत काम केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चिमुकला बचावला
दगडांवर कोरीव काम करणाºया कारागिरांच्या बाजूला सात वर्षांचा चिमुकला खेळत होता. दगडी बांधकाम कोसळून त्या ठिकाणी मोठा आवाज झाला. प्रचंड धूळ उडाली. त्या वेळी चिमुकल्याने लगेच तेथून पळ काढला. तो या दुर्घटनेतून बचावला आहे. तो जुन्या मंदिराजवळ खेळत असलेल्या ठिकाणी असलेल्या लोखंडी कमानीवर दगड कोसळले. त्यात ही लोखंडी कमान वाकली. दैव बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला, अशीच प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून व्यक्त झाली.