PCMC: पिंपरी-चिंचवडमधील बांधकामे होणार बंद, पालिकेचा नवा आदेश
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 17, 2023 03:13 PM2023-11-17T15:13:12+5:302023-11-17T15:14:04+5:30
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी 'रोड वॉशर सिस्टीम' असलेल्या वाहनांद्वारे रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे....
पिंपरी : फटाके, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी धोकायदाक झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी 'रोड वॉशर सिस्टीम' असलेल्या वाहनांद्वारे रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सूक्ष्म धूलिकणांमध्ये दुप्पट वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील हवेची पातळी धोकादायक श्रेणीत गेली आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ३२ प्रभागांमध्ये १६ वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकामस्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. प्रसंगी नोटीस बजावून कामाची जागा सील केली जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मालकांनी स्वयंपाकघरात पर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर करावा. तसेच डिझेल जनरेटरचा वापर करण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहन केले आहे.
शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर संकेतस्थळाच्या माध्यमातून ही नोंद झाली आहे. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम १०) वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता चक्क खराब श्रेणीपर्यंत पोचली होती. संकेतस्थळाच्या नोंदीनुसार भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वात खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. फटाक्यांसह अन्य बाबींमुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे उघड झाले आहे.
हवा प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातील रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे. मुख्य चौकांचे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली पाच नवीन वाहनांवर बसविण्यात आली आहे. त्याद्वारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका