कंटेनर आदळला घरावर; थरकाप उडवणारा प्रसंग, तळवडे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:36 AM2017-11-18T06:36:32+5:302017-11-18T06:36:41+5:30

निगडी-तळवडे रस्त्यावर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात एक कंटेनर उलटला. तर दुसरा कंटेनर रस्त्यालगतच्या घरावर आदळला. या घटनेमुळे घरात झोपलेल्या व्यक्तींचा...

 The container collapses on the house; Thunderbolt incident, incident in Talwade | कंटेनर आदळला घरावर; थरकाप उडवणारा प्रसंग, तळवडे येथील घटना

कंटेनर आदळला घरावर; थरकाप उडवणारा प्रसंग, तळवडे येथील घटना

Next

तळवडे : येथील निगडी-तळवडे रस्त्यावर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात एक कंटेनर उलटला. तर दुसरा कंटेनर रस्त्यालगतच्या घरावर आदळला. या घटनेमुळे घरात झोपलेल्या व्यक्तींचा थरकाप उडाला. अपघातानंतर तळवडेपासून गणेशनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
तळवडे येथील कहार माथा येथे भरधाव वेगातील कंटेनर (एम.एच. २० इ.जी. १४८८) अचानक उलटला. त्यानंतर त्यापाठोपाठ येत असलेल्या (एच.आर. ५५ एक्स २७३४) समोरील कंटेनरचा अंदाज न आल्याने त्याचा गोंधळ उडाला. अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेला कंटेनर रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मण हगवणे यांच्या घराच्या दिशेने वळाला. वेग नियंत्रणात न आल्याने या कंटेनरची हगवणे यांच्या घराच्या दर्शनी भागास धडक बसली. यामुळे घराला मोठा हादरा बसल्याने घरातील व्यक्ती भयभीत झाले. यामध्ये घराच्या दर्शनीभागाचे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक पंकज भालेकर व प्रवीण भालेकर यांनी त्याठिकाणी धाव घेतली. कंटेनर रस्त्यातच आडवा पडल्याने एक लेन बंद झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी झाली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर्स बाजूला घेण्यात आले आणि तासाभराने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
हा अपघात चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title:  The container collapses on the house; Thunderbolt incident, incident in Talwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात