उत्पादन शुल्क विभागाने अडवलेला मद्याचा कंटेनर दमदाटी करून नेला; दरोड्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 03:48 PM2020-10-02T15:48:20+5:302020-10-02T15:57:27+5:30
गोव्यामध्ये बनविलेले मद्य राज्यात उत्पादन शुल्क चुकवून आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
पिंपरी : गोव्यावरून उत्पादन शुल्क चुकवून आणलेला मद्याचा कंटेनर उत्पादन शुल्क विभागाने अडविला. मात्र कारवाई सुरू असताना दोन चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांना दमदाटी करून कंटेनर पळवून नेल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक योगेश नानभाऊ फटांगरे ( वय ४८, रा. वेस्टर्न हाईट्स, मसाला गल्ली, लालबाग मुंबई) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंटेनर (एमच २०, डिई ०२०७) मधील दोन इसम, होंडा सिटी कार ( एमएच १२ डीएम २०२० ) मधील तीन इसम आणि सॅन्ट्रो कार (एमएच १२ सीडी २८१३) मधील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोव्यामध्ये बनविलेले मद्य राज्यात उत्पादन शुल्क चुकवून आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने एक ऑक्टोबरला रात्री सापळा रचला. त्यानुसार कंटेनर ताब्यात घेऊन तळेगाव येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर तिथे दोन चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तींनी दमदाटी करून कंटेनर नेला. त्यात पन्नास लाख रुपयांचे मद्य असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मद्य आणि वीस लाख रुपयांचा कंटेनर जबरदस्तीने नेल्याची तक्रार दिली आहे.