देहूराेड उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकला ; वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 07:50 PM2018-08-05T19:50:32+5:302018-08-05T19:51:26+5:30
पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती .
देहूरोड : पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती . कंटेनर अडकल्याने वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर ( एच आर 55 टी 9541 ) देहूरोड एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या भागातून सेवा रस्त्यावरून जात असताना एलिव्हेटेड व उड्डाणपूलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या चौकात पहिल्या सिमेंट पिलरला अडकला . कंटेनर अडकल्याने जोरात आवाज झाल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गास अपघात झाला असल्याची शक्यता गृहीत धरून त्याठिकाणी धाव घेतली . तोपर्यंत अर्ध्याहून अधिक कंटेनर पुलाच्या सिमेंट पिलरला घासून पुढे जाऊन अडकून पडला होता . कंटेनर अडकल्याने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती . अखेर अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनरच्या मागील उजव्या बाजूच्या सर्व चाकांची हवा कमी करून हळू -हळू पिलरला घासत चालकाने कंटेनर बाहेर काढला . तोपर्यंत पुणे बाजूकडे वाहनांची मोठी रांग लागली होती . रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर बाहेर पडलेल्या स्थानिकांना सोमाटणे , तळेगावकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागले .
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात महामार्गावर देहूरोडला स्वामी विवेकानंद चौकात आंबेडकर रोडच्या बाजूनेही अशाच प्रकारे पुलाच्या पिलरला एक कंटेनर अडकल्याचा प्रकार घडला होता . त्यामुळे असे प्रकार यापुढे होऊ नयेत याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास उपाययोजना करणेबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी वाहनचालक व स्थानिकांतून होत आहे.