सातही दिवस रुग्णालय ठेवा सुरू!
By admin | Published: December 22, 2015 01:09 AM2015-12-22T01:09:01+5:302015-12-22T01:09:01+5:30
महापालिकेचे दवाखाने रविवारी सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवकांनी दिली. तर दवाखाना रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचा असल्याचे
पिंपरी : महापालिकेचे दवाखाने रविवारी सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवकांनी दिली. तर दवाखाना रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचा असल्याचे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दवाखाने सुरू असावेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिली. रविवारी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत नगरसेवक पाठपुरावा करणार का, महापालिका प्रशासन कोणता निर्णय घेणार यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
रावेत, वाल्हेकरवाडी आदी उपनगरांचा विस्तार झपाट्याने होत असताना नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक सुविधांचा अभाव परिसरात पहावयास मिळतो. त्यातच आरोग्य विभागाची उदासीनता,अपुरा कर्मचारीवर्ग, रुग्णांना मिळणारी सुविधा, कमी जागेत असणारे रुग्णालय, दुसऱ्या मजल्यावर रुग्णालय असल्यामुळे रुग्णांना जीना चढून जाणे त्रासदायक आहे. परिसराचा वाढता विस्तार पाहता पालिका प्रशासनाने परिसरात अद्ययावत रुग्णालय उभे करणे आवश्यक आहे.
- सोमनाथ भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते
पालिकेचे रुग्णालय हे जनतेसाठी आहे. नागरिकांना जेव्हा गरज असते, तेव्हा उपचार मिळत नसेल, तर त्याचा नागरिकांना काय फायदा? रविवार असला, म्हणून काय झाले, एखादा आजार दिवस, वार ठरवून होत नाही. त्यामुळे रविवारी महापालिकेची ओपीडी सुरूच असली पाहिजे. महापालिकेची ओपीडी बंद असल्याने खासगी डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - शत्रुघ्न काटे, नगरसेवक
आमच्यासारख्या सर्वसामान्यांना सरकारी दवाखाना लाइफलाइन आहे. परंतु या दवाखान्यात सर्व सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. तसेच कागदपत्र जमा करण्यात वेळ वाया जातो. खासगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतात. हा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. म्हणून सरकारी दवाखान्यात सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हेच अपेक्षित आहे.
- अविनाश देवकर, बोपखेल नागरिक
पालिकेचा दवाखाना गरिबांसाठी आहे. ज्यांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही, अशांसाठी पालिकेने ही सेवा सुरू केली आहे, मात्र असे होतच नाही. खरे तर ही ओपीडी सायंकाळी पाचपर्यंत सुरू असणे गरजेचे आहे. सध्या दुपारी १२ नंतर ओपीडी बंद केली जाते. याचा फायदा काय? शेवटी रुग्णांना खासगी रुग्णालयातच जावे लागते.
- सुरेखा जाधव, गृहिणी
आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र हाल अपेष्टाचं जास्त सहन करावे लागतात. तासनतास रांगेत उभे राहू शकत नाही, ज्येष्ठांसाठी राखीव बाक नाहीत. पाण्याची सोय व्यवस्थित नाही. रविवारी दिवसा सुविधा उपलब्ध झाली आमचा आधार होईल.
- सूर्यकांत तापकीर, ज्येष्ठ नागरिक
भोसरी रूग्णालयात वैद्यकीय सेवा रविवारीसुद्धा सुरू असते. डॉक्टर, व कर्मचारी वर्गाच्या नवीन भरतीची प्रक्रिया प्रशासन स्तरावर चालू झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा लवकर निकाली लागण्याची शक्यता आहे. नागरिकांनी संवाद साधावा. - डॉ. एस.एम. शिंदे
वैद्यकीय अधिकारी,