बेशिस्तीमुळे सातत्याने अपघात
By admin | Published: May 9, 2017 03:39 AM2017-05-09T03:39:38+5:302017-05-09T03:39:38+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून
मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून ही बाब समोर आली असतानाही वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत.
राजधानी मुंबई व आयटी हब पुणे ही शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत याकरिता मुंबई-पुणे या ९४ किमी अंतराच्या देशातील पहिल्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. हा महामार्ग जलद प्रवासाबरोबर वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिला आहे. वारंवार होणारे भीषण अपघात व वाहतूककोंडी यामुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग वा कासवगती महामार्ग अशी होऊ लागली आहे.
द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वेक्षणात या मार्गावरील जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे अर्थात चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.
या मानवी चुका रोखण्यासाठीही या मार्गावर यंत्रणेने विविध उपाययोजना केल्या. ज्यामध्ये स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांची छबी टिपत नियमांचा भंग करणारे कारचालक व लेन कटिंग करणारे अवजड वाहनांचे चालक यांना दंड करणे, लेनची शिस्त वाहनचालकांना समजावी याकरिता माहितीचे बोर्ड लावणे, रस्त्यावर मार्किंग करणे आदी कामे केल्यानंतरही या मार्गावर ना वाहनांचा वेग कमी झाला, ना लेन कटिंगची समस्या कमी झाली. वारंवार या घटना व अपघातांची पुनरावृत्ती होत असतानाही वाहन चालकांकडून शिस्तव नियमांचे पालन केले जात नाही.
वारंवार मानवी चुकांमुळे अपघात होत असतानाही चालक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे दुदैव म्हणावे लागेल.