बेशिस्त पार्किंगमुळे सतत वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:39 AM2018-08-29T01:39:03+5:302018-08-29T01:39:19+5:30
आकुर्डी : नो पार्किंग झोन करण्याची नागरिकांची मागणी
रावेत : प्रशस्त रस्ते असूनही बेशिस्त पार्किंगमुळे रावेत, धर्मराज चौक,आकुर्डी रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी ठिकाणी वाहतूककोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी परिसरातील मुख्य चौकातील काही भाग ‘नो पार्किंग झोन’ करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
रावेत, वाल्हेकरवाडी परिसराची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. दिवसेंदिवस या परिसरातील लोकसंख्यादेखील वाढत आहे. प्रशस्त रस्ते असले, तरी येथील वाहनांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यात या परिसरात मोठमोठे मॉल, हॉटेल, विविध बँका, शोरूम सुरू झाल्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी वाढते. त्यातच या भागात आयटी कंपनीतील लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या मंडळींच्या शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशी येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते.
आकुर्डी रेल्वे स्थानकातून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी उत्तर व
दक्षिण भागात असे मुख्य दोन प्रवेशद्वार आहेत. मात्र दोन्ही प्रवेशद्वारांवर वाहनधारकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
भोंडवे कॉर्नर
रावेत येथील भोंडवे कॉर्नरजवळ अनेक राष्ट्रीयीकृत बँका, हॉटेल, जीम आणि इतर व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. विविध बाबींच्या खरेदीसाठी आणि बँकेतील व्यवहारासाठी येथील परिसर नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे वाहनांची गर्दीसुद्धा होते. गर्दीमुळे वाहतूककोंडीत भर पडते. त्यामुळे या परिसरातही नो र्पाकिंग झोन असणे आवश्यक आहे.
गुरुद्वारा चौक
वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौक नेहमी गजबजलेला असतो. येथे विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणारे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यामुळे सायंकाळी येथील चौकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. विद्यार्थी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे उभ्या करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते, त्याच बरोबर याच ठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेली मंडई वाहतूककोंडीत भर घालते. त्यामुळे हा भाग नो र्पाकिंग झोन करावा अशी ही मागणी होत आहे.
बिजलीनगर स्पाईन रोड
या मार्गावर वारंवार होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन मागील वर्षी चिंचवड वाहतूक विभागाने हा मार्ग नो व्हायलेशन झोन म्हणून जाहीर केला होता. त्यानुसार या मार्गावर कोणत्याच प्रकारच्या गाड्या उभ्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभर या मार्गावर गाड्या उभ्या राहत नाहीत; परंतु सायंकाळच्या वेळी मात्र दररोज येथे अनेक गाड्या उभ्या राहतात. त्यामुळे नो व्हायलेशन झोन केवळ दिवसासाठीच आहे का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. .