ठेकेदार झाले महापालिकेचे कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:37 AM2019-01-06T01:37:11+5:302019-01-06T01:37:33+5:30
स्थायी समितीमध्ये संगनमत : निविदा प्रक्रियेत रिंग करून नागरिकांच्या पैशांची लूट
पिंपरी : महापालिकेतील सुमारे एक कोटीपेक्षा अधिक रकमेच्या निविदा प्रक्रियेत ठरावीक ठेकेदारच दिसून येत आहेत. संबंधित ठेकेदार निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करीत आहेत.
स्थायी समितीमध्ये रस्ते विकास व वायसीएम रुग्णालयातील निविदेवरून सदस्यांचे एकमत होत नसल्याने सभा दोन वेळा तहकूब केली. त्यानंतर ठेकेदारांनी सदस्यांना पुरेसा आर्थिक वाटा दिल्यानंतर एका दिवसात सुमारे ३५७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. रस्त्याच्या विकास कामांसाठी कोट्यवधींच्या तरतुदी करण्यात आली़ मात्र, शहरातील विकासकामे विविध ठिकाणी असली, तरी ठेकेदार मात्र ठरावीकच आहेत.
वाकडच्या कामात रिंग : मयूर कलाटे
पिंपळे निलख-वाकड या प्रभागातील निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी रिंग केली असून, त्यामध्ये स्थायी समितीचे सदस्य व अधिकारी यांच्याशी संगनमत आहे. त्यामुळेच काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक रस्त्यासाठी सुनील आजवाणी, पिंक सिटी रस्त्यासाठी एच. सी. कटारिया, वाकड-पिंपळे निलख या रस्त्यासाठी कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर व कस्पटे वस्ती येथे गॅबियन भिंत बांधण्यासाठी एस. एस. साठे यांनी निविदा भरली आहे. प्रत्येक निविदा संंबंधित ठेकेदार वाटून घेत आहेत, असा आरोप मयूर कलाटे यांनी केला आहे.
अधिकाºयांशी संगनमत : दत्ता साने
४राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाºया भाजपाने सत्तेत आल्यापासून ठेकेदारांमार्फत महापालिकेचा कारभार सुरू केला आहे. शहराच्या विविध भागांतील विकासकामे एस. साठे, क्रिपलानी, सुनील आजवाणी, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, घोसे, लालदीप, प्रथमेश व देव कन्स्ट्रक्शन या काही ठरावीक ठेकेदारांमार्फत सुरू आहे. हा प्रकार महापालिका आयुक्त यांच्या संमतीने सुरू आहे, असा आरोप दत्ता साने यांनी केला.