बसवराज बोम्मई यांचे वादग्रस्त विधान! कर्नाटकला जाणाऱ्या एसटी मंगळवेढ्याला थांबवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 04:12 PM2022-11-27T16:12:49+5:302022-11-27T16:14:18+5:30
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून बसची तोडफोड होण्याची शक्यता
पिंपरी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून बसची तोडफोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून शनिवारी विजापूरसाठी (कर्नाटक) निघालेल्या दोन बसेस मंगळवेढा बसस्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. तर, दोन बसेस रद्द करण्यात आल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद पेटला आहे. बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही भाग आमचाच असल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी कर्नाटकच्या एसटी बसची तोडफोड करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एसटी बसचीही कर्नाटकमध्ये तोडफोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बस या थांबविल्या आहेत. यात वल्लभनगर आगारातून विजापूरसाठी निघालेल्या दोन बसेस मंगळवेढा बसस्थानकावर थांबविल्या आहेत.
वल्लभनगर आगारातून एसटीच्या चार बसेस या कर्नाटकमध्ये रोज जात असतात. त्यामध्ये विजापूरसाठी दोन तसेच गाणगापूरसाठी बस असतात. सकाळी वल्लभनगर आगारातून विजापूरसाठी निघालेल्या बसेस या मंगळवेढा आगारात तेथील प्रशासनाने थांबवल्या. तसेच सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटीला पुढे सोडण्यास मज्जाव करण्यात आला. संबंधित चालकाने वल्लभनगर आगारात संपर्क साधला असता मंगळवेढा आगारातून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले.
कर्नाटककडून सूचना नाहीत
वल्लभनगर आगारातून तसेच आगाराबाहेर कर्नाटकच्या बसेस उभ्या आहेत. या बसच्या चालक-वाहकांशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी बस परत आणण्याबाबत तसेच इथेच महाराष्ट्रात थांबण्याबाबत त्यांना कर्नाटक प्रशासनाकडून कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे सांगितले.