मराठी ‘तारका’वरून फेस्टिव्हलमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:23 AM2017-09-02T01:23:21+5:302017-09-02T01:23:24+5:30
पिंपरी-चिंचवडच्या फेस्टिव्हलमध्ये ‘महाराष्ट्रच्या सुवर्णतारका’ हा कार्यक्रम होणार असून, त्यास प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्डाची परवानगी आणि नाव नोंदणीकृत नसताना ‘तारका’ हे नाव वापरून रसिकांची फसवणूक केली जात
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या फेस्टिव्हलमध्ये ‘महाराष्ट्रच्या सुवर्णतारका’ हा कार्यक्रम होणार असून, त्यास प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्डाची परवानगी आणि नाव नोंदणीकृत नसताना ‘तारका’ हे नाव वापरून रसिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप टिळेकर यांनी केला आहे. तर महाराष्ट्रच्या सुवर्णतारका हा आम्ही तयार केलेला कार्यक्रम असून ‘तारका’ या शब्दाची कोणाची मक्तेदारी नाही, असा दावा प्रसिद्ध नृत्यांगना तेजश्री अडिगे यांनी केला आहे.
महापालिकेच्या वतीने या वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलची सुरुवात केली आहे. एका तपानंतर महापालिका हा महोत्सव आयोजित करीत आहे. त्यात रविवारी निर्माते निखिल निगडे, तेजश्री अडिगे यांचा महाराष्टÑाच्या सुवर्णतारका हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या नावावर टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ‘तारका’ या शब्दावरून नवा वाद सुरू झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
‘सुवर्णतारका’ ऐवजी ‘सुवर्णनायिका’
सेंसॉर बोर्डाकडून नावाबाबत परवानगी घेतली असताना आमचे नाव दुसरी संस्था कशी काय वापरू शकते, आमचे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा टिळेकर यांनी दिला आहे. तर ‘आम्ही कोणत्याही संस्थेचे पूर्ण नाव वापरलेले नाही. तरीही कोणाचा आक्षेप नको म्हणून आम्ही महाराष्टÑाच्या ‘सुवर्णतारका’ ऐवजी ‘सुवर्णनायिका’ असे नाव बदलले आहे. तरीही कोणी स्टंटबाजी करीत असेल, तर ती चुकीची आहे, असे प्रत्युत्तर अडिगे यांनी दिले आहे.
रसिकांची दिशाभूल : महेश टिळेकर
मराठी तारका या कार्यक्रमाची निर्मिती दहा वर्षांपूर्वी झाली. या कार्यक्रमाचे कौतुक राष्टÑपतींनीही केले. आता हे नाव वापरून रसिकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. कोणताही कार्यक्रम करताना नाव रजिस्ट्रेशन, सेंसॉर बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. सादर होणाºया गाण्यांचे कॉपीराईट घेतले जातात. मात्र, अशा प्रकारे कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आता निर्माता निगडे यांनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली आहे, असे दिग्दर्शक महेश टिळेकर म्हणाले.
स्टंटबाजी करणे चुकीचे : तेजश्री अडिगे
मराठी तारका आणि महाराष्टÑाच्या सुवर्णतारका हा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्याची मांडणी, लेखन, सादरीकरण वेगळे आहे. मात्र, ‘तारका’ या शब्दावरून स्टंटबाजी केली जात आहे. आम्ही कोठेही मराठी तारका असे नाव दिलेले नाही. महाराष्टÑाच्या सुवर्णतारका असे नाव दिले आहे. तारका या नावाची कोणाची मक्तेदारी कशी काय असू शकते? चूक झाल्याचे लिहून द्या, अशी मागणी संबंधित लोक करीत आहेत. कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे लिहून देण्याचा प्रश्नच येत नाही, असे नृत्यांगना तेजश्री अडिगे म्हणाल्या.