उद्योगनगरीत महिन्याला एक खून, टोळीयुद्ध अन् किरकोळ कारणांवरून वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:24 AM2018-02-01T03:24:57+5:302018-02-01T03:25:34+5:30
उद्योगनगरीत गेल्या वर्षभरात अगदी किरकोळ करणांवरूनही खून करण्याचे प्रकार वाढलेला आहे. वर्षभराची खुनांच्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता, महिन्याकाठी सरासरी एक खून असे प्रमाण असल्याचे निदर्शनास येते. कधी एका महिन्यात एखादी खुनाची घटना घडली आहे
पिंपरी : उद्योगनगरीत गेल्या वर्षभरात अगदी किरकोळ करणांवरूनही खून करण्याचे प्रकार वाढलेला आहे. वर्षभराची खुनांच्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता, महिन्याकाठी सरासरी एक खून असे प्रमाण असल्याचे निदर्शनास येते. कधी एका महिन्यात एखादी खुनाची घटना घडली आहे, तर कधी एकाच महिन्यात दोन ते तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांचा वचक नसल्याने खुनांच्या घटनांत वाढ झाली आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१७ या १२ महिन्यात खुनाच्या १३ घटना घडल्या आहेत. नव्या वर्षात २०१८ मध्ये जानेवारीच्या तिसºया आठवड्यात अजंठानगर येथे तरूणाचा खून झाला. गतवर्षीचे हे खूनसत्र पुढे तसेच सूरू असल्याचे या घटनेतून निदर्शनास आले आहे. किरकोळ कारणावरून तसेच टोळीयुद्धातूनही खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
टोळीयुद्धातून वाढले हल्ले
ताथवडेतील सोनवणे वस्तीत भाऊबंदकीच्या वादातून एकाचा खून झाला. ही घटना १६ नोव्हेंबर २०१७ ला घडली. त्यानंतर २१ नोव्हेंबरला शहराला हादरवुन टाकणारी टोळीयुद्धातील खुनाची घटना घडली. सराईत गुंड सोन्या काळभोर व त्याच्या साथीदारांनी अनिकेत जाधव या महाकाली टोळीच्या म्होरक्याचा निर्घृन खून झाला. त्यानंतर पिंपरीत दुसºयाच दिवशी व्यापाºयाचा गळा दाबुन खून केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर ग्रिव्हज कॉटन कंपनीजवळील झाडीत एका परप्रांतिय व्यकतीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. डिसेंबरमध्ये दिघीत एका जमिन खरेदी विक्री व्यवसाय करणाºया एजंटाचा डोक्यात दगड घालून खून झाला. पाठोपाठ चिखलीत एका तरूणाच्या खुनाची घटना घडली.
किरकोळ करणांसाठी खुनी हल्ले
पिंपरीतील मंडईत अनैतिक संबंधातून तरूणीचा खून केल्याची घटना मार्चच्या पहिल्याच आठवड्यात घडली. त्यानंतर तीन महिने अशी घटना घडली नाही. २१ आॅगस्टला निगडीत शंकर झेंडे या हॉटेल व्यवसायिकाचा अपघात भासवून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. ११ सप्टेंबरला निगडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी महिलेच्या मुलाचा त्याच्याच मित्रांनी खून केला. २४ सप्टेंबरला केशवनगरमध्ये परप्रांतिय मजुराचा मृतदेह आढळून आला. त्याच्याच सहकाºयाने डोक्यात दगड घालून खून केला असल्याचा प्रकार दोनच दिवसात पोलिसांच्या तपास पथकाने उघडकीस आणला. २५ सप्टेंबरला विद्यानगर येथे तरूणाच्या खुनाची घटना घडली. पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपींनाही शिताफिने पकडले. पुर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे तपासात पुढे आले. थेरगावात रिक्षाचालकाने वृद्धाचा खून केल्याची घटना २८ सप्टेंबर २०१७ ला घडली. सप्टेंबरमध्ये शहरात तब्बल चार खुनाच्या घटना घडल्या.
आयटीनगरी असुरक्षित
गतवर्षी जानेवारी महिन्यात रसिला राजू ओपी या अभियंता तरूणीचा हिंजवडीतील आयटी कंपनीत खून झाला. २९ जानेवारी २०१७ ला हा खून झाला. त्यानंतर खूनसत्र पुढे सुरूच राहिले आहे. आयटी अभियंता तरूणीच्या खुनानंतर पुणे शहर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबविल्या. आयटीतील या घटनांना अटकाव बसला असला तरी खुनाच्या अन्य ठिकाणच्या घटनांचा आलेख वाढतच राहिला आहे.