जुन्या-नव्यांचा संगम निर्णायक
By admin | Published: August 9, 2015 03:41 AM2015-08-09T03:41:11+5:302015-08-09T03:41:11+5:30
आयटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांची न झालेली एकजूट अन् सत्ताधाऱ्यांनी बांधलेली
वाकड : आयटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांची न झालेली एकजूट अन् सत्ताधाऱ्यांनी बांधलेली सर्वपक्षीय नेत्यांची परिपक्व मोट त्यांच्या पथ्थ्यावर पडली. तब्बल १४ जागा जिंकून ग्रामदैवत श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार पुन्हा एकहाती सत्ता ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.
सर्वपक्षीय पॅनलने सुशिक्षित यंग स्टार आणि अनुभवी कार्यकर्ते यांचा साधलेला संगमही मतदारांना भावला. त्यातच सत्ताधाऱ्यांनी तयार केलेले हिंजवडीचे व्हिजन डॉक्युमेंट मतदारांसमोर ठेवले. आजवर केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले. आयटीच्या तुलनेने भविष्यात करण्यात येणारे महत्त्वपूर्ण विकासकामे पाणी प्रकल्प, गावाच्या अन्य समस्या, राहिलेली अर्धवट कामे कशी पूर्ण करणार याबाबतही त्यांनी मतदारांना विश्वास दिला.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या अनेक चर्चा आणि बैठका सुरुवातीला झाल्या. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर विद्यमान सरपंच श्यामराव हुलावळे यांनी स्वत:च्या वॉर्ड क्रमांक ४मधून उमेदवारीचा त्याग करीत एकमेव वॉर्ड क्रमांक ४ संपूर्ण बिनविरोध केला. राष्ट्रवादीचे युवा नेते सुरेश हुलावळे, माजी उपसरपंच मल्हारी साखरे, माजी सरपंच दत्तात्रय साखरे, सरपंच श्यामराव हुलावळे, दिलीप हुलावळे, सूर्यकांत साखरे, प्रदीप साखरे यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलची निवडणूक लढविण्यात आली. विरोधी गटाचा एक, तर या पॅनलचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने १३ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील ११ जागा जिंकत ग्रामदैवत श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलने आपला आकडा १४वर नेला. (वार्ताहर)
हिंजवडी ग्रामपंचायत : एकूण जागा १७ : प्रभाग एक : जयमाला संभाजी हुलावळे (४७५), नागेश बबन साखरे (४४१), स्मिता संजय जांभूळकर (४५७). प्रभाग दोन -रोहिणी दत्तात्रय साखरे (९५९), रेखा संदीप साखरे (९४७), राहुल अरुण जांभूळकर (बिनविरोध). प्रभाग तीन : प्रवीण दत्तात्रय जांभूळकर (९६६), श्रीकांत दिलीप जाधव (८९२), सीमा कैलास साखरे (८४४). प्रभाग क्रमांक चार : उमेश सूर्यंकात साखरे (बिनविरोध), स्वप्नाली सुभाष साखरे (बिनविरोध), आरती प्रवीण वाघमारे (बिनविरोध). प्रभाग पाच : सागर दत्तात्रय साखरे (५६४).