सत्ताधारी व विरोधकांनी एचबीओटी मशीनवरून प्रशासनाला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:46 PM2018-12-21T12:46:54+5:302018-12-21T12:48:35+5:30
महापालिकेच्या पहिल्या सभेत विषय क्रमांक सात एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या विषयावरून चर्चा झाली.
पिंपरी : यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या प्रश्नाच्या चर्चेत महापालिका प्रशासनास सत्ताधारी आणि विरोधकांनी धारेवर धरले. वायसीएममधील अधिष्ठाता निवडीलाही आक्षेप घेतला. महापालिकेच्या पहिल्या सभेत विषय क्रमांक सात एचबीओटी मशीन चालविण्यास देण्याच्या विषयावरून चर्चा झाली. त्यापूर्वीच्या विषयात शिक्षक वर्गीकरणावरून शाब्दिक गोंधळ सुरू असताना सुलक्षणा धर यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र गोंधळामुळे महापौरांनी सांगूनही त्या बोलल्या नाहीत. त्यामुळे सभा तहकूब झाली. दुसऱ्या सभेत एचबीओटीवरून पुन्हा चर्चा झाली. डॉ. पद्माकर पंडित यांच्या निवडीला आक्षेप घेतला. आशा शेंडगे, संदीप वाघेरे यांनी मते व्यक्त केली. शेंडगे यांनी कायदेशीर नियुक्ती आहे का? या नियुक्तीसाठी आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित केला. वायसीएममध्ये दुकानदारी सुरू आहे, असा आरोप संदीप वाघेरे यांनी केला. तर रुपीनगरात ओपीडी नाही, असे पंकज भालेकर म्हणाले. सीमा सावळे यांनी एचबीओटी मशीन कोणाच्या कालखंडात आले. हे सर्वांना माहीत आहे. वायसीएमच्या दोन अधिकाऱ्यांची जबादारी काढून घेऊन डॉ. पद्माकर पंडित यांची नवीन नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती योग्य आहे का ? ज्यांच्याकडे हा विभाग होता. त्यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही. आयुक्तसाहेब विश्वासात घेऊन काम करा.
नामदेव ढाके म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला हवे. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी. काम न करणाऱ्यांना डॉ. पंडित यांनी थेट घरी पाठवावे. आयुक्तांनी डॉ़ पंडित यांना टार्गेट द्यावे, वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू करावे. त्यानंतर हा विषय मंजूर केला. त्या वेळीही राष्ट्रवादीने आक्षेप घेतला.