पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांचं 'ते' संभाषण रेकॉर्ड; धक्कादायक माहिती आली समोर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:56 PM2021-08-19T18:56:52+5:302021-08-19T18:57:41+5:30

स्थायी समिती अध्यक्षांसह 5 जणांना पोलीस कोठडी

Conversation record of the Chairman of the Standing Committee of Pimpri Municipal Corporation; Shocking information came to the fore | पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांचं 'ते' संभाषण रेकॉर्ड; धक्कादायक माहिती आली समोर  

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांचं 'ते' संभाषण रेकॉर्ड; धक्कादायक माहिती आली समोर  

Next

पुणे :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तक्रारदार ठेकेदाराला ‘ते वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितल्याचे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे यांना ‘3 टक्क्याऐवजी 2 टक्के करा असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉईस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. त्यानुसार हे एक प्रकारचे मोठे रॅकेट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे याचा तपास करणे गरजेचे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितल्यानंतर लांडगे यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेतील पाच जणांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

नितीन लांडगे यांच्यासह ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ( स्वीय सहाय्यक वय 56, रा. रामनगर सोसायटी गव्हाणेनगर  भोसरी), अरविंद भीमराव कांबळे ( शिपाई, रा. भीमनगर, पिंपरी), राजेंद्र जयवंत शिंदे ( संगणक ऑपरेटर रा. जय मल्हार, थेरगाव वाकड) विजय शंभुलाल चावरिया (लिपीक, रा. धर्मराजनगर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हा जाहिरात ठेकेदार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेडील 26 वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी  त्यांनी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क ऑर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोली रकमेच्या बीड अमाऊंटच्या 3 टक्के रक्कमेनुसार 10 लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 6 लाख रूपयांचे देण्याचे ठरले. त्यातील 1 लाख 18 हजार रूपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र 1 लाख 18 हजार रूपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि पाच जणांना अटक केली. गुरूवारी ( दि.19) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

नितीन लांडगे यांच्या मालमत्तेचा शोध सुरू असून, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. त्यांची याव्यतिरिक्तही मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सापळा कारवाई दरम्यान पिंगळे यांच्याकडे अंगझडती आणि कार्यालय झडती

दरम्यान, 5 लाख 68  हजार 560  रूपयांची रक्कम मिळाली असून, त्यातील 5 लाख 20 हजार रूपये स्थायी समितीच्या सभापतींना देण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले आहे. या रकमेचा तपास करायचा आहे. राजेंद्र शिंदे यांच्याकडेही 24 हजार 480 रूपयांची रक्कम मिळाली आहे. या सर्व गुन्हयाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
----------------

Web Title: Conversation record of the Chairman of the Standing Committee of Pimpri Municipal Corporation; Shocking information came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.