पिंपरीतील कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्के; दीड महिन्यात शहरात २०२८ संशयित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 08:58 PM2020-04-27T20:58:28+5:302020-04-27T21:03:14+5:30
मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र कमी; आजपर्यंत चार जणांचा मृत्यू
विश्वास मोरे-
पिंंपरी : देशात सर्वत्र कोरोनाचा वेग वाढत असताना पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत हा वेग कमी आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात २०२८ संशयित आढळले असून, त्यापैकी ८५ जण पॉझिटिव्ह, तर १८६६ जण निगेटिव्ह आढळले आहे. संशयित रुग्णांच्या तुलनेत सकारात्मक चाचणी येणाऱ्यांचे प्रमाण पाच टक्के आहे. तर निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण ९०.१ टक्के तर मृतांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूंचा फैलाव महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात झपाट्याने होत असताना याचा वेग पुण्याचे जुळे शहर ओळखणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये कमी आहे. याचे कारण पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर ११ मार्चपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना केल्या.
परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला. तसेच पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेचे भोसरीतील रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय सज्ज केले. तसेच परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन केले. तसेच संशयितांच्या तपासण्या वाढविल्या. २० मार्चपर्यंत शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ वर थांबली. त्यानंतर सलग दहा दिवस शहरात एकही रुग्ण सापडला नाही.
चौदा दिवसांच्या उपचारानंतर १२ जण कोरोनामुक्तही झाले. शहर शंभर टक्के कोरोनामुक्त होत असतानाच ३१ मार्चच्या दरम्यान दिल्लीतील मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४४ जण सहभागी झाल्याची माहिती पुढे आली आणि कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होऊ लागला.
औद्योगिकनगरीतील चित्र : उपाययोजनांमुळे विषाणूंचा प्रसार झाला कमी
१- पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी जोखीम स्वीकारून काम करीत आहेत. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आया, वॉर्डबॉय आदी कर्मचारी काम करतात. यातील जवळपास १९३ जण अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनासाठी सज्ज आहेत.
२- दुबई, फिलिपिन्स, अमेरिकेतून प्रवास करून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला. संशयितांच्या तपासण्या केल्या. तसेच होम क्वारंटाइनही केले.
३-आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून तर आजपर्यंत एकही रजा न घेता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, विविध संस्था, प्रशासकीय व्यवस्थेची संवाद ठेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी केली.
४- महापालिकेत २००९ मध्ये स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले होते. त्यावेळी असणारी वैद्यकीय टीम हीच कोरोनासाठी निवडण्यात आली. या टीमला साथ आजार कसा रोखावा याचा अनुभव असल्याने हीच टीम कोरोनासाठी निवडण्यात आली. त्यामुळेही कोरानावर मात करण्यास मदत
झाली आहे.
५- पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे कोरोनावर उपचारासाठी उपलब्ध केले. तसेच संशयितांना क्वारंटाइन करणे, कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात कडक उपाययोजना करणे, घरांचे सर्वेक्षण करून माहिती घेणे, फ्ल्यू क्लिनिक सुरू करणे, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत फ्ल्यू तपासणी केंद्रे उभारणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी कडक करणे, डॉक्टर आपल्या दारी असे विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात ११ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या ४५ दिवसांत ८५ रुग्ण आढळले आहेत. दाखल संशयित २०२८ रुग्णांपैकी १८३६ जणांची चाचणी नकारात्मक आली आहे. हे प्रमाण ९०.१ टक्के आहे. एकूण रुग्णांपैकी पुण्याबाहेरील रुग्ण २ असून पिंपरीतील; परंतु पुण्यातील रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण ९ आहेत. तर आजवर कोरोनामुळे चार जण दगावले असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरानामुक्त होण्याचे प्रमाण ३२.९ टक्के आहे. एकूण रुग्णांपैकी १८६४ जणांना डिस्चार्ज केला आहे.
कोरोनाविरोधी लढ्यात सर्वांचेच योगदान मोलाचे आहे. यासाठी काम करणाऱ्या आरोग्य, वैद्यकीय, पोलीस अशा सर्वच अत्यावश्यक सेवेतील सेवकांचे योगदान आहे. पहिला रुग्ण सापडल्यापासून आपण कडक उपाययोजना केल्या त्याचा परिपाक म्हणजे रुग्णांचे प्रमाण कमी आहे. तसेच अनुभवी डॉक्टरांची टीम चांगले योगदान देत आहे. आपण कोरोनामुक्त झालेलो नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन शंभर टक्के केल्यास कोरोनावर मात करू शकतो. - श्रावण हर्डीकर, आयुक्त