Corona Vaccination In Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या दिवशी ४५६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 11:50 PM2021-01-16T23:50:58+5:302021-01-16T23:51:09+5:30
या कारणांमुळे ८०० जणांचे लसीकरण होऊ शकले नाही
पिंपरी : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम शनिवारपासून सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. शहरातील आठ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी आठ केंद्र मिळून ४५६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली आहे.
महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे यांना सर्वात प्रथम लस टोचण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर केशव घोळवे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.संगिता तिरुमणी, डॉ.बाळासाहेब होडगर, आदी या वेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. दिवसभरामध्ये एका केंद्रावर १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. तसेच चार आठवडयानंतर या लसीच्या दुसरा डोस लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. कोविन ॲपव्दारे लाभार्थींच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस व्दारे संदेश पाठविला जाणार असून, सदर संदेशामध्ये लसीकरण दिनांक, वेळ व स्थळ याचा उल्लेख असेल. लस टोचल्यानंतर लाभार्थ्यांना लसी बाबत माहिती देण्यात येते आहे. लस टोचल्यानंतर त्रास झाल्यास करावयाच्या उपाययोजना, लसीच्या चार आठडयानंतर येणाऱ्या दुसऱ्या डोसची तारीख, तसेच लस टोचल्यानंतर आर्धा तास निरिक्षण कक्षामध्ये निरिक्षणाखाली थांबण्यासाठी सुचित करण्यात येते.
. लसीकरण केंद्र नांव लसीकरण करण्यात आलेले लाभार्थी संख्या
१ यमुनानगर रुग्णालय ६०
२ नवीन जिजामाता रुग्णालय ७१
३ नवीन भोसरी रुग्णालय ६६
४ वाय.सी.एम.रुग्णालय ४९
५ पिंपळे निलख दवाखाना ४९
६ कासारवाडी दवाखाना ६५
७ तालेरा रुग्णालय ५०
८ ईएसआयएस रुग्णालय ४६
__
या कारणांमुळे ८०० जणांचे लसीकरण होऊ शकले नाही ?
कोविन ॲपव्दारे लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना लसीकरणाची वेळ देण्यात आली होती. काही कर्मचारी बाहेरगावी गेले असल्याने आणि काहींना इतर आजार असल्याने काही प्रमाणात लसीकरण कमी झाले. काही कर्मचारी अनुपस्थित राहिले. एका केंद्रांवर १०० असे एका दिवसात ८०० जणांना लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते.