Corona virus : पिंपरीत गुरुवारी १४६ जण पॉझिटिव्ह तर ९१ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 21:40 IST2021-01-07T21:39:54+5:302021-01-07T21:40:16+5:30
पिंपरीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ४४२ तर कोरोनामुक्तांची ९३ हजार ९९७ वर पोहोचली..

Corona virus : पिंपरीत गुरुवारी १४६ जण पॉझिटिव्ह तर ९१ जणांची कोरोनावर मात
पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच आता ब्रिटनमधील नवीन कोरोनाच्या विषाणूचे रुग्ण शहरात आढळले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. नवीन कोरोनाविरोधातील लढ्यासाठी महापालिकेच्या वतीने भोसरीतील रुग्णालय सज्ज ठेवले आहे.
पिंपरी शहरात गुरुवारी १४६ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ३ हजार ५९५ जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ८६७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ९८३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर ३ हजार ५९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ६३९ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ४४२ वर पोहोचली आहे. तर कोरानामुक्तांची संख्या ९३ हजार ९९७ वर पोहोचली आहे. कोरोनाने आज एकाचा बळी गेला आहे. निगडीतील ४६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ७६७ वर पोहोचली आहे.
चीनमध्ये कोरोनाने धुमाकुळ घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड मार्चमध्ये शहरात पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातही रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर आॅक्टोबरपासून रुग्ण संख्येत कमी होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला आहे.
ब्रिटनहून आलेल्या २६८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर हे रुग्ण नवीन कोरोनाचे आहेत किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रवाशांच्या घशातील द्रवाचे नमुने एआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाचा अहवाल प्रलंबित आहे.
...........
भोसरीत स्वतंत्र रुग्णालय
महापालिकेच्या वतीने नवीन कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भोसरीतील तीनशे बेडचे रुग्णालय सज्ज ठेवले आहे. नवीन कोरोनासाठी डॉक्टरांची स्वतंत्र टीमही तयार केली आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीसाठी आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे पथक तयार केले आहे.
..................