Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात ४५ नवीन कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या ६७८ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 10:50 PM2020-06-05T22:50:51+5:302020-06-05T22:51:14+5:30
महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज १७९ जणांना दाखल केले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७८ वर गेली आहे. तर ३५ जण कोरोनामुक्त झाले. तर दापोडी आणि राजगुरूनगर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे.
औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात आज दिवसभरात एकूण ४५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये २४ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेला एकच रूग्ण पुण्यातील आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, काळेवाडी, रूपीनगर, वाकड, दापोडी, फुलेनगर, पिंपरी, अजंठानगर, पिंपळे सौदागर,चऱ्होली, भोसरी, खेड येथील नागरिकांचा समावेश आहे.
दापोडी, राजगुरुनगरमधील व्यक्तीचा मृत्यू
महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज १७९ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या १५३ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच २४८ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ५४५ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये १९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजपर्यंत ४०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये किवळे, पिंपळेसौदागर, पिंपरी, बौद्धनगर, वाकड, खराळवाडी, आनंदनगर, भोसरी, निगडी, काळेवाडी फाटा येरवडा, देहूरोड, सोलापूर, जुन्नर, खडकी आंबेगाव येथील नागरिकांचा समावेश आहे. तर दापोडी आणि राजगुरूनगर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. राजगुरूनगर येथील ५८ वर्षांच्या पुरूषांस, दापोडीतील ८० वर्षांच्या वृद्धास महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले होते. त्या दोघांचा आज मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील १६ आणि पिंपरीतील १२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.