Corona virus : पिंपरी शहरात शुक्रवारी दिवसभरात ४९७ नवीन कोरोनाग्रस्त , आठ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:13 PM2020-07-11T13:13:29+5:302020-07-11T13:28:32+5:30
शहरातील एकूण रुग्णसंख्या पोहचली ६५४९ वर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हद्दीबाहेरील ४९७ जणांना दिवसभरात कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या ६५४९ वर पोहोचली आहे. तर १६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरातील आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
लॉकडाऊन पाचमध्ये नियम शिथिल केल्याने औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. नागरिक बिनदिक्कतपणे रस्त्यांवर फिरत आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने संशयित रूग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या वाढू लागली आहे.
दिवसभरात रूग्णालयांत १४१५ जणांना दाखल करण्यात आले आहे. तसेच ९२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २३८२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शहरातील रूग्णालयांत दाखल रूग्णांची संख्या ३०२६ आहे. तर १०६४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच दिवसभरात १६८ जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत ३८४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.............................
कोरोनाने आठ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे खेडमधील नेहरूनगरातील ८२ वर्षीय महिलेचा, चिंचवडेनगर येथील ८० वर्षीय महिलेचा, पिंपरी गावातील ६१ वर्षीय पुरूषाचा, पिंपळेगुरव येथील ५२ वर्षीय पुरूषाचा, आनंदनगर येथील ४२ वर्षीय पुरूषांचा, नेहरूनगरातील ६० वर्षीय महिलेचा, इंद्रायणीनगरातील ४६ वर्षीय महिलेचा, मोरेवस्ती येथील ४७ वर्षीय पुरूषाचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकुण मृतांची संख्या १३१ झाली आहे. त्यात पिंपरीतील ९५ आणि पुण्यातील ३६ जणांचा समावेश आहे.