Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ५६ जणांना कोरोनाची बाधा; एकूण रुग्णसंख्या ८४३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:24 AM2020-06-10T00:24:13+5:302020-06-10T00:25:38+5:30
दिवसभरात रुग्णालयात २३२ दाखल; नऊ जण कोरोनामुक्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून मंगळवारी दिवसभरात ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४३ वर गेली आहे. तर नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जळगाव येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३३ वर पोहोचली आहे.
औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात मंगळवारी दिवसभरात एकूण ५६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ३३ पुरुष, तर २३ महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये कस्पटे वस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ भोसरी, आनंदनगर, काळभोरनगर, साईबाबानगर चिंचवड, दापोडीतील गुलाबनगर, पवारवस्ती तसेच सिद्धार्थनगर, पाटीलनगर चिखली, बौध्दनगर, नाणेकर चाळ पिंपरी, जुनी सांगवी, बेलठिकानगर थेरगाव, वाकड, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवी सांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, विनायकनगर पिंपळे निलख, शाहूनगर चिंचवड, पिंपरीगाव, आदित्य बिर्ला कॉलनी थेरगाव, बोपोडी, जळगाव व हडपसर येथील नागरिकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज २३२ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या ५९ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच ३६२ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ७३१ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. लिंकरोड पिंपरी, जुनी सांगवी, जयभवानीनगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड, महात्मा फुलेनगर, भाटनगर, समतानगर नवीसांगवी, परंडवाडी, शिरुर व आंबेगाव येथील रुग्णांना रुग्णालयातून मंगळवारी घरी सोडण्यात आले.
आजपर्यंत ४८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत महापालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या १४ रुग्णांचा तर महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी असलेल्या १९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.