Corona virus : पिंपरीत आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई; २०० रुपये दंड आकारला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:42 PM2020-06-08T13:42:11+5:302020-06-08T13:47:30+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फिजिकल अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरण्याचे ८ एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे बंधनकारक केले आहे. मात्र तरीदेखील नागरिकांकडून या नियमाचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे यापुढे कोरोनाच्या कालखंडात सार्वजनिक ठिकाणी वापरणे अनिवार्य केले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ५०० रुपये दंड निश्चित केला होता. मात्र, स्थायी समितीने त्यात कपात करून दोनशे रुपये करावा, असा ठरावा मंजूर केला आहे.
पिंपरी - चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फिजिकल अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे आवश्यक आहे. शहरातील नागरिक मास्कचा वापर करत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावरताना मास्क परिधान न करणाठया नागरिकांविरोधात कारवाई करत ५०० रुपये दंड वसूल केला जात होता. परंतु, दंडाची रक्कम जास्त आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजगार नाही. घराबाहेर पडल्यावर मास्क खराब झाला. तर, ५०० रुपये दंड भरणे अशक्य आहे. त्यामुळे ५०० रुपयांऐवजी २०० रुपये दंडाची आकारणी करावी, अशी उपसूचना स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सभेत मंजूर केली आहे.
...........................
पावसाळ्यात दोन मास्क जवळ बाळगा
कोरोनाचा संकट समोर असतानाच आता पावसाळ्यातील साथीच्या रोगांचा सामना करावा लागणार आहे. पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया आशा आजारांची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेकडून धुरीकरण, औषध वाटप, जनजागृती अशा उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त खबरदारी बाळगावी. दोन मास्क जवळ बाळगावेत. हात वारंवार सॅनिटाईज्ड् करा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने आता साथीचे आजारही तोंड वर काढणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हर्डीकर म्हणाले, नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कार्यालयात जाताना एक जादा मास्क स्वत:जवळ ठेवावा. पावसाळ्यात कार्यालयाला जात असताना मास्क ओला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरडा मास्क बाळगण्याची आवश्यकता आहे. हँड सॅनिटाईझेशन व्यवस्थित आणि वारंवार चालू ठेवावे. यामुळे अन्य आजारांपासूनपण बचाव करु शकता. सुरक्षित अंतराचे पालन करणे गरजेचे आहे.