Corona virus : मावळ तालुक्यात दुसरा कोरोना रुग्ण; ३७ वर्षीय नर्सला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:41 PM2020-05-11T19:41:58+5:302020-05-11T19:44:36+5:30
दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील रुग्णालयात काम करून रात्री मुक्कामाला तळेगाव व माळवडी येथे येत असत.
वडगाव मावळ : कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या आणखी एका नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मावळात दुसरा रूग्ण आढल्याने खळबळ उडाली आहे.तीन दिवसांपूर्वी तळेगावमध्ये एक संशयित कोरोनाबाधित नर्स सापडली होती. आता तळेगाव शेजारीच असलेल्या माळवडी येथे राहणारी एक ३७ वर्षीय नर्स कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने तळेगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील एकाच रुग्णालयात कामाला आहेत. या दुसऱ्या नर्सला देखील पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तळेगावबरोबरच माळवाडी देखील यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या नर्सच्या कुटुंबातील पती व दोन मुलगे यांना देखील पुण्याच्या रुग्णालयात पाठविण्यात आले असून जवळचा संपर्क असल्याने त्यांचीही कोरोना निदान चाचणी करवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त संबंधित नर्स आणखी कोणा-कोणाच्या संपर्कात आली होती, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
तळेगाव स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय नर्सच्या खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना निदान चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेश काढून तळेगाव दाभाडे, तळेगाव स्टेशन, वराळे, माळवाडी, कातवी, आंबी, वारंगवाडी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प तसेच वडगावचा काही भाग पुढील आदेश मिळेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमाटणे, इंदोरी, परंदवडी आदी ठिकाणी ' बफर झोन ' जाहीर करण्यात आला आहे. दुसरी नर्स देखील प्रतिबंधित क्षेत्रात राहणारीच असल्याने पुन्हा नवीन आदेश काढण्यात आलेला नाही.
दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील रुग्णालयात काम करून रात्री मुक्कामाला तळेगाव व माळवडी येथे येत असत. तळेगावच्या नर्सच्या शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना निदान चाचणीचा अहवाल अद्यापि प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या संपर्कात आलेल्या एकूण 38 जणांचे तळेगावमध्येच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी जवळच्या संपकार्तील सहाजणांची कोरोना निदान करवून घेण्यात येणार आहे.
माळवाडी येथील नर्सचे घर एका चाळीत असल्याने तसेच चाळीतील रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करीत असल्याने काळजी व्यक्त करण्यात येत आहे. माळवाडीच्या नर्सच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गट विकास अधिकारी शरद माळी व तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी माळवडी येथे जाऊन संबंधित नर्स राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी माळवाडीचे सरपंच सुनील दाभाडे व पोलीस पाटील रवींद्र दाभाडे उपस्थित होते.