Corona virus : कोरोनाच्या औषध व इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांना अटक करा : विरोधीपक्षनेते राजू मिसाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:29 AM2020-09-18T11:29:17+5:302020-09-18T11:29:48+5:30
कोरोना संकटाच्या काळात देखील रुग्णांची प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे.
पिंपरी : कोरोनाचा विळखा वाढत असताना सर्वसामान्य माणसांची लूट होत असून औषध व इंजेक्शनचा काळा बाजार करणा-यांना अटक करावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधीपक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.
विरोधीपक्षनेते राजू मिसाळ यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. मिसाळ म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गावर नियत्रंण आणण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. शहरातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. त्याच प्रमाणे राज्य शासनाकडूनही आवश्यक ती मदत मिळत आहे तसेच जंम्बो हास्पिटल नेहरुनगर व अँटो क्लस्टर येथे उभारण्यात आले आहे. एकुण शहरातील सरकारी व खाजगी वैद्यकीय यंत्रणा यासाठी काम करीत आहे. परंतु मनपाच्या काही रुग्णांलयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन हे बाहेरुन आणावे लागत असल्याबाबतच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. शहरातील सर्व सामान्य अगोदरच धास्तावलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडून महागडी औषधे व इंजेक्शन बाहेर मागल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक योग्य नाही.
मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांस बाहेरून औषधे किंवा इंजेक्शन आणण्यास सांगितल्यास त्याबाबत नगरसदस्य आणि विरोधीपक्षनेते कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रारी पाठवाव्यात. औषधांचा व इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या कोणत्याही दर्जांच्या हॉस्पिटल, मेडीकल व डॉक्टर यांची गय केली जाणार नाही.’’