Corona virus : पिंपरी शहरातील रुग्णालयांचे म्हणजे 'नाव मोठे अन् लक्षण खोटे'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:43 PM2020-07-28T12:43:39+5:302020-07-28T12:44:09+5:30
जेवढे पैसे घेता तेवढी तरी सुविधा द्या, रुग्णांच्या नातेवाईकांची माफक अपेक्षा
युगंधर ताजणे
पिंपरी : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ‘त्या’ रुग्णालयातील जनरल वॉर्डात भरती झालो. डिपॉझिट म्हणून 30 हजार रुपये देखील घेतले गेले. पुढे महिनाभर रुग्णालयात उपचार घेत होतो. मात्र या काळात त्यांच्याकडून मिळालेली सेवा अतिशय मानसिक त्रास देणारी होती. प्यायला पाणी हवे असल्यास देखील तीन ते चार वेळा नर्सेसला विनवणी करावी लागत होती. जनरल वॉर्डमध्ये तर डॉक्टर फिरकत सुध्दा नव्हते. उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांचे महिनाभर नाव ऐकले परंतु रुग्णालयातून डिस्जार्ज मिळेपर्यंत ते काही दिसले नाहीत. यासंबंधी विचारणा केली असता ते सुट्टीवर आहेत, एका महत्वाच्या मिटींगमध्ये आहेत असे सांगितले जायचे. साडेतीन लाख रुपयांचे बील भरुन रुग्णालयातून बाहेर पडलो. किमान जेवढे पैसे घेता त्या प्रमाणात उपचार देखील करा. अशी व्यथा होनाजी अहिनवे (रुग्णाचे नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली आहे.
होनाजी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांना सांगण्यात आल्यानंतर ते तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले. काही दिवसानंतर त्यांना तेथील ढिसाळ नियोजन व कार्यशैलीचा प्रत्यय येऊ लागला. उपचारापूर्वी पैशांची मागणी, ती पूर्ण केल्यानंतर उपचार केव्हा केले, कसे केले याची रुग्णाला देखील माहिती नसते अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या बाजुच्या कॉटवर असणा-या एका रुग्णाला पाणी हवे असताना त्यासाठी त्याला अनेक तास प्रतिक्षा करावी लागली. एकदा पाणी दिल्यानंतर दोन ते तीन दिवस कुणी पाहत नव्हते. नर्सेस सोडल्यास कुणीही रुग्णाकडे फिरकत देखील नाही. जे बेड होते त्यांचा दर्जा अतिशय नित्कृष्ठ होता. दहा ते बारा दिवस आयसीयुमध्ये असताना तेवढ्या कालावधीत कुठला डॉक्टर तिथे आल्याचे आठवत नाही.
‘त्या’ रुग्णालयाचा अनुभव अतिशय क्लेशकारक होता. बाथरुम मध्ये साबण नाही. सँनिटायझरची व्यवस्था नाही. अशी परिस्थिती होती. नर्सेस औषधे देण्यासाठी, आॅक्सिजन देण्यासाठी यायच्या. इतर डॉक्टर बाहेरुन रुग्णांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे घरातील इतर नातेवाईक आकुर्डीतील आणि बालेवाडीतील एका पालिका प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या दवाखान्यात दाखल होते. मात्र त्यांना तिथे सर्वसोयीसुविधा चांगल्या मिळाल्या. रुग्णांची काळजी घेतली जात होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
पॅकेज घ्या, घरी ‘क्वारंटाईंन’ व्हा आम्ही उपचार करु
कोरोनाचा वाढणारा संसर्ग यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने बेड उपलब्ध नाहीत. अशावेळी रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काही खासगी रुग्णालयांनी नवा ‘फंडा’ शोधून काढला आहे. यात रुग्णाने आपली चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच क्वॉराईनटाईन होण्याचा पर्याय रुग्णांसमोर ठेवल आहे. यासाठी दहा ते वीस हजारांपर्यंतचे पँकेज रुग्णालय देणार असून यामध्ये रुग्णाला टेलिमेडिसनच्या साह्याने समुपदेशन, थर्मामीटर, हायड्रोक्लोरोक्वीनच्या गोळया, आॅक्सीमीटर, मास्क, ग्लोव्हज आदी सुविधा देण्यात येणार आहेत. एकीकडे प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल असताना रुग्णांना पुरेसे उपचार मिळत नाहीत. अशावेळी घरी क्वारंटाईन झाल्यानंतर रुग्ण बरा होईल का? असा प्रश्न रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत.