Corona virus : पिंपरीतील 'रेड झोन'मधील सीमा झाल्या 'असुरक्षित'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:07 AM2020-05-14T11:07:58+5:302020-05-14T11:44:02+5:30
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सीमा रस्त्यांवरील सुरक्षितता झाली ढिली.
विश्वास मोरे-
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा आणि पासधारकांना ये-जा करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सीमा रस्त्यांवरील सुरक्षितता ढिली झाली आहे. आवो-जाओ घर तुम्हारा...अशी परिस्थिती असून वाकड, हिंजवडी, देहूरोड, आळंदी, निगडी परिसरातील सीमा असुरक्षित असल्याचे 'लोकमत'च्या टीमने केलेल्या ' ऑन द स्पॉट ' पाहणीत आढळून आले.
महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पिंपरी-चिंचवड शहरात ४ मार्चला पहिले तीन रुग्ण आढळले. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी कडक उपाययोजना केल्या. वेळीच उपाययोजना केल्याने गेले दोन महिने पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील कोरोनावाढीचा आलेख कमी राहिला आहे.
मात्र, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सुरक्षा यंत्रणा ढिली झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर रेडझोनमध्ये येते. तसेच शहरात २१ कंटेन्मेट झोन केल्याने या शहरातून विनापरवाना बाहेर जाण्यास आणि येण्यास मनाई आहे. शहराच्या सीमा नाक्यांवर गेल्या महिन्यांत कडक तपासणी करण्यात येत होती. मात्र, सध्या 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत शहराच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था ढिली झाल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत शहरात येणाऱ्या विविध रस्त्यांवरील चेक नाक्यांची पाहणी केल्यानंतर सीमा असुरक्षित झाल्याचे वास्तव समोर आले.
शहरातून पुणे-मुंबई जुना महामार्ग, द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळुरू महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग असे रस्ते जातात. नाशिक महामार्गावर मोशीत, आळंदीतून शहरात येण्यासाठी आळंदी, देहू फाटा, चाकण एमआयडीसीतून आणि देहूगावातून तळवडे फाट्यावर तसेच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामागार्ने निगडी भक्ती-शक्ती चौक, द्रुतगती महामार्गाने किवळेत, सांगुडीर्तून किवळेत, नेरेतून पुनावळेत, हिंजवडीतून भूमकर चौकात, वाकड चौकात, बालेवाडीतून वाकडमध्ये, ज्युपीटर हॉस्पिटलकडून पिंपळे निलखमध्ये, औंधमधून सांगवीत, बोपोडीतून दापोडीत आणि विश्रांतवाडीतून दिघीत येण्यासाठी सीमा रस्ते आहेत.
विनापरवाना नागरिकांची ये-जा : वाढता लॉकडाऊन पोलिसांना त्रासदायक
1 - कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी- चिंचवड महापालिकेचे, पोलीस विभागाचे, राज्य व केंद्रीय विभागांचे कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना आदेशानुसार वगळले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परवानगी किंवा पासशिवाय शहराच्या सीमेवरून आत आणि बाहेर जात येत नाही. मात्र, नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सीमांवरून ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. रावेत परिसरात सुमारे पंचवीस तरुण बॅगा घेऊन चालल्याचे दिसून आले. त्यांना हटकले असता देहूरोडकडून आलो आहे, असे त्यांनी सांगितले. मग या तरुणांना शहराच्या सीमेवर का अडविले नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो.
2 - वाढता लॉकडाऊन पोलीस यंत्रणेसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. पोलीसही कोरोनाचे शिकार ठरू लागले आहेत. तर दुपारी पारा चाळीस अंशावर पोहोचत असल्याने त्यांना नाक्यावर उभे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. प्रतिबंधित क्षेत्राशिवाय अन्य शहरात भाजीपाला आणि किराणा माल, दूध दुकानांना सवलत दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले आहे.
केवळ प्रतिबंधित क्षेत्रात होतेय कडक अंमलबजावणी
पिंपरी : महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य क्षेत्रातही सर्व प्रकारचे दवाखाने, रुग्णालये, क्लिनिक, प्रसूतिगृहे व औषधी दुकाने यांनाही वगळण्यात आले आहे. ती संपूर्ण कालावधीकरिता खुली केली आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीतच दूध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री यांची कडक अंमलबजावणी होत आहे.
शहरातील २१ कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरित भागात भाजीपाला व फळे विक्रीही सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत निश्चित केलेल्या जागांवरच सुरु राहील. उर्वरित कालावधीमध्ये विक्रीस प्रतिबंध राहील. घरपोच भाजीपाला व फळे विक्री ही मनपाच्या पूर्व मान्यतेनुसारच करण्यात येईल.
प्रतिबंधित क्षेत्रात मटण व चिकन दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच कंटेन्मेंट वगळून सवलत देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे व तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीतच पास घेऊन सुरू आहेत.