Corona virus : पिंपरीत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत गोंधळ ; महापालिका प्रशासनाच्या आदेशात नाही स्पष्टता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 07:13 PM2020-08-04T19:13:06+5:302020-08-04T19:15:38+5:30
प्रशासनाने नव्याने आदेश काढून हा संभ्रम दूर करावा...
नारायण बडगुजर
पिंपरी : महापालिकेचे कामकाज सुरू असले तरी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत प्रशासनाचा घोळ सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतच्या आदेशात स्पष्टता नसल्याने हा गोंधळ झाला आहे. याचा फटका दिव्यांग कर्मचाऱ्यांना बसत असून, कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा कपात केल्या जात आहेत. प्रशासनाने नव्याने आदेश काढून हा संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेचे पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा आणि अग्निशामक हे सहा विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. तसेच कम्युनिटी किचन, घरोघरचे सर्र्वेक्षण, भाजी मंडई, अशा विविध उपक्रम व कामांसाठी देखील महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली होती. तसेच शहरात सध्या दहापेक्षा अधिक कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यासाठी देखील मोठ्या संख्येने कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार पाच ते १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करायचे असले तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित असतात.
लॉकडाऊनच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये पाच ते १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे कामकाज सुरू होते. यातून दिव्यांग कर्मचाऱ्यांना वगळले होते. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर १०० टक्के कामकाज सुरू करण्यात आले. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दोन्ही शहरांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन झाला. या लॉकडाऊनदरम्यान देखील महापालिकेचे कामकाज १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश होते. त्यानंतर देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट होत नसल्याने कामकाज पूर्ववत सुरू झाले नाही. त्यामुळे नेमके किती कर्मचारी कामावर उपस्थित आहेत, किंवा किती कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना वगळले आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे काही विभागातील अधिकाऱ्यांकडून दिव्यांग कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत सक्ती केली जात आहे. कामावर उपस्थित होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजांमध्ये कपात केली. परिणामी संबंधित कर्मचाºयांना याचा नाहक त्रास होऊन अन्याय झाला असल्याची त्यांची भावना आहे. कपात केलेल्या रजा व वेतन पुन्हा जमा करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
अंध कर्मचाऱ्यांचीही होतेय कोंडी
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेत आठ हजारांवर कायम कर्मचारी आहेत. शासनाच्या निकषानुसार तीन टक्के अर्थात अडीचशेवर दिव्यांग कर्मचारी आहेत. यात काही अंध कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामावर येताना-जाताना तसेच कामाच्या ठिकाणी देखील या कर्मचाऱ्यांना इतर नागरिक तसेच सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागते. यात थेट स्पर्श व संपर्क होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन शक्य होत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहता येत नाही. यातून घालमेल वाढली असून, त्यांची कोंडी होत आहे.
...........
कोरोनाच्या महामारीतही महापालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका राखणे अपेक्षित आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहेत.
- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ.
.................
शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन झाला. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सध्या १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे कामकाज सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नव्याने आदेश काढण्यात येणार आहे.
- मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी, महापालिका