Corona virus : मावळात सलग दुसर्या दिवशी कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:14 PM2020-06-17T12:14:07+5:302020-06-17T12:14:56+5:30
सुरक्षित समजल्या जाणार्या मावळ तालुक्यात कोरोनाची लागण वाढत असताना दोन जणांचे मृत्यु झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण
लोणावळा : मावळ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या ४५ रुग्णांपैकी दोन जणांचा दुदैवी मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री लोणावळ्यातील वलवण गावात राहणार्या ५६ वर्षीय महिलेचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तर आज बुधवारी सकाळी ओळकाईवाडी, कुसगाव येथे राहणार्या डॉक्टरांचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाला. सुरक्षित समजल्या जाणार्या मावळ तालुक्यात कोरोनाची लागण वाढत असताना दोन जणांचे मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मावळ तालुका बराच कालावधी कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग यशस्वी झाले होते. शासनाने स्थलांतरींना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची परवानगी दिल्यानंतर मावळात कोरोनाचा शिरकाव झाला व कोरोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहचली आहे. यापैकी दोन जणांचा दोन दिवसात मृत्यू झाला. वलवण येथिल मयत झालेली महिला दुबईहून गोवा व गोव्यातून लोणावळ्यात आली होती. ओळकाईवाडी येथील डॉक्टरांनी कोठेही प्रवास केला नव्हता. त्यांचे हिमोग्लेबिन कमी झाल्याने पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व आज सकाळी दुदैवी मृत्यू झाला. बाहेरून शहरात व ग्रामीण भागात आलेल्या नागरिकांमुळे मावळात कोरोनाचे संकट गडद होत चालले असताना देखील नागरिक हलगर्जीपणा करत आहेत. कारण नसताना बाहेर गावी जाणे व बाहेर गावावरुन येणे असे प्रकार सुरुच आहे. तळेगावात देखील आज चार जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मावळ तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असल्याने ने येत्या काळात कोरोनासह साथीच्या रोगाचा मोठा धोका तालुक्याला होणार असल्याने सर्व मावळवासीयांनी खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, चेहर्यावर मास्क लावावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन मावळचे तहसिलदार मधूसुदन बर्गे व आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी केले आहे.