Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:27 PM2020-07-25T20:27:47+5:302020-07-25T20:30:55+5:30
कोरोना काळात अनेक कामे व तक्रारींसाठी महापौर कक्षात दिवसभर प्रचंड वर्दळ असते.
पिंपरी : महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या कक्षामध्ये काम करीत असलेल्या एका महिला कर्मचा-याचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महापौर कक्षातील इतर कर्मचा-यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्यांना विलगीकरण करून घेण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात अनेक कामे व तक्रारीसाठी महापौर कक्षात दिवसभर अनेकांची वर्दळ असते. महापौर कक्षामध्ये हिशेबाचे काम पाहण्यासाठी एक महिलाकर्मचारी आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेली कर्मचारी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांसंदर्भात कामे करीत.
गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून फाईल आल्या. तसेच, त्या फाईलचा पाठपुरावा करण्यासाठी अनेकजण येतात. त्यामुळे संबंधित महिलेच्या संपर्कात कोणी आले होते का, हे माहिती घेण्यात येत आहे. महापौरांच्या कक्षातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने इतर कर्मचा-यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येणार आहे.