Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट, रुग्णदर आणि मृत्युदरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:53 AM2020-06-27T02:53:33+5:302020-06-27T02:54:43+5:30

लॉक डाऊनचे निर्बंध उठविल्यामुळे नागरिकांकडुन फिजिकल डिस्टनसिंग पाळले जात नाहीये..

Corona virus: Corona virus is increasing iUHn Pimpri Chinchwad city, increasing morbidity and mortality | Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट, रुग्णदर आणि मृत्युदरात वाढ

Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट, रुग्णदर आणि मृत्युदरात वाढ

Next

पिंपरी : औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाºया पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होत आहे. गेल्या २६ दिवसांत रुग्णवाढीचा वेग आणि मृत्यूदरही वाढला आहे. जून महिन्यात १८५३ रुग्णांची वाढ झाली असून, ४८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1413 कोरोनामुक्त झाले आहेत. लॉकडाऊन शिथिल जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तपासण्या वाढविण्याबरोबरच ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, त्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहेत.
चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिले तीन रुग्ण ८ मार्चला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचे अहवाल १० मार्चला पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर महाराष्टÑात पिंपरी-चिंचवड शहर गाजले होते. मात्र, मार्च अखेरीपर्यंत १२ रुग्ण कोरोनामुक्त होत असतानाच मरकज येथील कार्यक्रमातून परतलेल्यांपैकी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. एप्रिल आणि मेमध्ये कोरोनाचा आलेख कमी होता. मात्र, जून महिन्यात हा वेग वाढला आहे. शहरातील दाटवस्तींचा भाग, झोपडपट्ट्या, चाळीनंतर हा कोरोना शहरातील सर्वच भागात पसरल्याचे दिसून येत आहे.
........................................
१० मार्च ते ३१ मे या कालखंडात कोरोनाचे ५२२ रुग्ण सापडले. रुग्णवाढीत हा दर २५ टक्के आहे. या कालखंडात औद्योगिकनगरीतील ८ आणि शहराबाहेरील १२ जणांचा मृत्यू झाला होता. जूनच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. १ ते २६ जूनपर्यंत १८५३ रुग्ण सापडले आहेत. रुग्णवाढीचा वेग ७५ टक्के आहे. या महिन्यात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
...............................
एेंंशी टक्के नागरिकांमध्ये लक्षणेच नाहीत
विविध भागांतील २३७५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १३८९ कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९४५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी ९१ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. ३४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एकूण रुग्णांपैकी ८१९ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत.
.........................................

जुलैअखेरपर्यंत दहा हजार रुग्ण
  पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. पाच झोपडपट्ट्यांमध्ये ३० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. जवळपास १४०० रुग्ण झोपडपट्ट्यांतीलच आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या चौदा दिवस लागत आहेत. हाच रेट कायम राहिला तर जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या दहा हजारांचा आकडा गाठेल, अशी भीती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे.
  आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठीचा कालावधी १५ दिवसांचा राहिला, तर जुलैअखेरपर्यंत साडेदहा हजार रुग्ण होतील. चौदा दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. हा वेग  राहिला, तर दहा हजारापर्यंत रुग्णवाढ होईल.
.................................
झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
सर्वाधिक रुग्णवाढ पिंपरी भागातील जुन्या झोपडपट्ट्यांमध्ये होत आहे. दापोडी, नेहरूनगर, विठ्ठलनगर, भाटनगर, बौद्धनगर, आनंदनगर, साईबाबानगर, अजंठानगर या भागातील मागील दोन दिवसांत रुग्णवाढ जास्त आहे. मिलिंदनगर, वेतळनगरमध्येही रुग्ण सापडले आहेत. पण, मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला नाही. विठ्ठलनगरमध्ये ४५, अजंठानगरमध्ये २००, आनंदनगरमध्येही २०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर पाच झोपडपट्ट्यांमध्ये तीस पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
...................................
तपासण्या वाढविल्या
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘महापालिकेने तपासण्याही वाढविल्या आहेत. दिवसाला साडेपाचशे तपासण्या होत आहेत. त्यामुळेही रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. एनआयव्ही, नारी, आयसीएमआर, आयसर, हायरोकेअर, कृष्णा, मेट्रो पोलीस, आदित्य बिर्ला आणि डॉ. डी. वाय. पाटीलमधील लॅबकडे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले जात आहेत. महापालिकेची स्वतंत्र लॅब तयार करण्याचे काम सुरू आहे.
.......

Web Title: Corona virus: Corona virus is increasing iUHn Pimpri Chinchwad city, increasing morbidity and mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.