Corona Virus : बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची कमी होई ना गर्दी: पिंपरी पोलिसांनी जागेवरच केली २५० जणांची अँटिजेन तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 01:59 PM2021-05-22T13:59:33+5:302021-05-22T14:00:58+5:30
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहे.
पिंपरी : बाजारपेठेत गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांकडून पिंपरी कॅम्पातील शगुन चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या २५० नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे बाजारपेठेत ‘पॉझिटिव्ह’ चर्चा होताना दिसून आली.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे. असे असतानाही बेशिस्त नागरिकांची बेफिकीरी कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून बाजारपेठ परिसरात अँटिजन तपासणीचे शिबिर घेण्यात आले. मंगळवारी व बुधवारी हे शिबिर झाले. शगुन चौकात झालेल्या शिबिरात सामान्य नागरिकांची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील वैद्यकीय विभागाच्या पथकाने ही तपासणी केली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.
शगुन चौकात वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. घराबाहेर पडण्याचे कारण पोलिसांकडून विचारण्यात येत होते. तसेच पादचाऱ्यांकडेही विचारणा केली जात होती. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या वाहनचालक व पादचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यात महिला, जेष्ठ नागरिकांचीही संख्या मोठी होती. काही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चाचणी करून घेतली. काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काही वाहनचालकांनी आल्या मार्गाने परत जाणे पसंत केले.
एक पोलीस पाॅझिटिव्ह
पिंपरी पोलीस ठाण्यात झालेल्या शिबरात अधिकारी व कर्मचारी असे एकूण १०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात एका पोलिसाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने त्यांना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आला.
पिंपरी कॅम्पात गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबत जनजागृती केली जात आहे.