Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा १७ वा बळी; एकाचदिवशी ३२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 05:56 PM2020-05-25T17:56:14+5:302020-05-25T21:18:30+5:30
येरवड्यातील महिलेचा कोरोनाने घेतला बळी
पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाने १७ वा बळी घेतला असून, पुण्यातील येरवड्यातील महिलेचा बळी गेला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यातील उपचार घेणाऱ्या आणि मृतांची संख्या दहावर पोहचली आहे. तर दुपारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत ३२ भर पडली आहे.
चिंचवडमधील आनंदनगर, किवळे, सांगवी, येरवडा या भागातील रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंतची रुग्णांची संख्या ३८२ वर गेली आहे. हाय कॉन्टक्ट रिस्कमध्ये आलेल्या ४५० जणांना क्वारंटाइन केले आहे.पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. शुक्रवारपासून शहरातील निर्बंध शिथिल केले आहे. परंतु, चार दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. काल एकाच दिवशी २१ जणांचे, तर त्यानंतर दुसºया दिवशी ५०, तिसऱ्या दिवशी ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. अडीच महिन्यांतील ही वाढ सर्वात मोठी आहे. तर १८२ सक्रिय रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉट स्पॉट ठरली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, बौद्धनगर, पिंपरी आणि राजगुरूनगरातील असे ३२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुणे आणि ग्रामीणच्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील १४ पुरुष आणि १५ स्त्रियांचा समावेश आहे. तर पुण्यातील एक पुरुष आणि एक महिला, राजगुरूनगरमधील एका पुरूषाचा समावेश आहे.
सोमवारी १०७ संशयितांना रुग्णांलयात दाखल केले आहे. २०२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असून महापालिका रुग्णालयात सक्रिय आणि संशयितांची संख्या ३९२ आहे. तर २४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे आहेत. तर २४९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजपर्यंत १७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णांची संख्या २९ असून, पिंपरी-चिंचवडमधील सात आणि पुण्यातील दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मात्र, इतर रुग्णालयात दाखल असणाºयांची संख्या २३ आहे.
सोमवारी सकाळी मृत झालेली महिला ही पुण्यातील येरवडा परिसरातील आहेत. तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. तसेच हाय कॉन्टक्ट रिस्कमध्ये आलेल्या ४५० जणांना क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची संख्या १० हजार ९९१ झाली आहे.