Corona virus : वेहरगावात आढळला कोरोनाबाधित, मावळातील पाचवा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:39 PM2020-05-21T17:39:24+5:302020-05-21T17:40:45+5:30
खोकला व थकवा आल्याने कार्ला येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला होता.
वडगाव मावळ : मावळात गुरूवारी वेहरगाव येथे कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर गेली आहे. परिणामी तालुकावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. तहसीलदार मधुसुदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी याबाबत माहिती दिली.
वेहरगाव येथील एकविरा देवीच्या पायथ्याशी एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. त्यामुळे तो तेथेच राहत होता. त्याला खोकला व थकवा आल्याने कार्ला येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला होता. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पोळ यांना संशय आल्याने त्यांनी त्याला तपासणीसाठी मंगळवारी (दि. १९) जिल्हा रूग्णालयात पाठवले होते. गुरूवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या एकाला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
अहिरवडे गावचे आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
मावळ तालुक्यात तळेगाव स्टेशन, माळवाडी येथील परिचारिकेचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मंगळवारी अहिरवडे गावात एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्यांच्या संपर्कातील आठ जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.