Corona virus : पिंपरीतील ‘वायसीएम’चे आधी कौतुक , पण पुरस्कार देताना पडला विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:32 AM2020-10-10T11:32:01+5:302020-10-10T11:32:23+5:30
कोरोना काळात आसामान्य काम करणाऱ्या कोरोना वारियर्सचा सन्मान
पिंपरी : राज्यात कोरोना महामारीच्या काळात असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते १५ आॅक्टोंबरला राजभवन मुबई येथे सत्कार होणार आहे. असामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जाहीर झालेल्या नावांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या एकाही कर्मचाऱ्यांचे नाव नाही. त्यामुळे राज्य शासनाला वायसीएमच्या कामाचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील सर्वच विभागांना या पुरस्कारामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यात जेव्हा कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तेव्हा वायसीएमचा मृत्यूदर हा एक टक्क्यापेक्षाही कमी होता. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच विभागातील रुग्ण हे वायसीएमला दाखल होत होेते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ येथे रुग्णांना मिळाला आहे.
कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित सर्व शासकीय रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय, खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना राज्य शासनाने प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून पुणे विभागात सर्वाधिक प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्याचे काम वायसीएमने केले आहे. वेळोवेळी वायसीएमच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे.
एकाही डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्याचे नाव नसल्याने वायसीएमच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत ८२ हजार ५०३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील ७६ हजार ७६३ रुग्ण बरे झाले असून, १ हजार ५०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ९३ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण हे १.२७ एवढे आहे.
---
पुरस्कारांमध्ये पुणे विभाग आघाडीवर
पुणे विभागातील १२ कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळणार आहे. त्यातील तीन पुणे एनआयव्ही येथील शास्त्रज्ञ आहेत. अमरावती ४, कोकण ५, नाशिक ५, नागपूर ६, औरंगाबाद ६, मुंबई ९, पुरस्कार मिळणाºयांमध्ये डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, कक्ष सेवक, सफाई कर्मचारी, आशा सेविका, औषध निर्माण अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.