Corona virus : मावळ तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:24 PM2020-05-07T19:24:13+5:302020-05-07T19:27:06+5:30
संबंधित परिचारिका शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत
तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन येथे एका ३४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तळेगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे. मावळ तालुका ऑरेंज झोनमध्ये असून आता या घटनेने तालुक्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.
तळेगाव शहर आणि स्टेशन भाग आणि तीन किलोमीटरच्या परिसरातील गावे ''कंटन्मेंट झोन '' म्हणून जाहीर करण्यात आल्याची घोषणा मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पत्रकार परिषदेत केली. आमदार सुनील शेळके, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, रंगनाथ उंडे आदी यावेळी उपस्थित होते.
संबंधित परिचारिका शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. तळेगाव स्टेशन भागातील घरून त्या कामासाठी येऊन - जाऊन काम करतात. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी (दि. ४) आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात या महिलेचा तपासणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि पथकाने तळेगाव स्टेशन परिसर सील केला आहे. सदरच्या महिलेवर औंध येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर महिला ही घरी एकटीच राहते. तिच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टक्टमधील व्यक्तींचा शोध सुरू आहे.
तळेगाव शहर, माळवाडी, वराळे, कातवी, वारंगवाडी, आंबी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव नगरपंचायतीच्या दक्षिण भागाचा कंटन्मेंट झोनमध्ये समावेश आहे. तर पाच किलोमीटरच्या बफर झोनमध्ये सोमटणे, इंदोरी, परंदवडी या गावांचा समावेश आहे. कंटन्मेंट झोनच्या पार्श्वभूमीवर तळेगाव स्टेशन आणि गाव भागात सर्व्हे करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. तळेगाव शहररात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. लॉकडाऊन व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.